प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं आहे. छगन भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य केलं. मर्दांच्या हाती मशाल आहे असंही यावेळी ते म्हणाले.
“छगन भुजबळ आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं गेल्यानंतरही आज जिद्दीने उभे आहेत. बेळगावमधील फोटो कोणी पाहिला तर माझ्यावर पुन्हा एकदा हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होईल,” असं मिश्कीलपणे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले “प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे”.
उद्धव ठाकरेंचं भाषण
“मला आल्यानंतर फारुख साहेब भेटले. वयाचं आणि महाराष्ट्र ते काश्मीर अंतर जास्त असल्याने आमची फार काही गाठभेट होत नाही. पण बाळासाहेब आणि त्यांची चांगली मैत्री होती. आल्यानंतर त्यांनी मला अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ सांगितलं. मी काही लढाई सोडणार नाही. अशी अनेक वादळं शिवसेनेने अंगावर घेतली आहेत. पण त्यावेळी वादळं निर्माण करणारेही सोबत लागतात आणि ते आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.