मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी केवळ रक्ताचे नाते सांगता येणार नसून त्यांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदूत्वाच्या विचारांचे नाते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी होते आणि बाळासाहेबांशी कोणतेही रक्ताचे नाते नसताना शिंदे हे त्यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
कोणत्याही राजकीय फायद्यातोटय़ाचा विचार न करता शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा घेऊन मी पुढे गेलो आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे ‘वारसा विचारांचा परिसंवाद’ आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून वाहन वाटप व स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम दादर येथील सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राहुल गांधी हिंगोलीमध्ये स्वा. सावरकरांविषयी अतिशय वाईट पद्धतीने बोलले आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्याबरोबर पायी चालले. यामुळे शिवसेनाप्रमुखांना काय वाटले असेल, असा सवाल फडणवीस यांनी केला. भाजपशी मतभेद असतील, तर तुम्ही आम्हाला शिव्या द्या. बाळासाहेबांनी ज्या विचारांनी शिवसेना स्थापन केली, तो विचार जिवंत राहील आणि एकनाथ शिंदे तो विचार घेऊन पुढे जात आहेत. सावरकरांना अपमानित करणाऱ्यांचा विचार जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.
स्वा. सावरकरांचा त्याग कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेबांचा हिंदूत्वाचा विचार घेऊन मी पुढे जात असून वेगळा निर्णय घेताना कोणाला काय व किती मिळेल, असा फायद्यातोटय़ाचा विचार कधीही केला नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली असून त्यांची यात्रा अडवून महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
‘सावरकर यांच्यावर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांना जनताच धडा शिकवेल’
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना स्वा.सावरकरांमधील‘स’ही माहीत नाही. स्वा. सावरकरांना स्वातंत्र्यापूर्वी काळय़ा पाण्याची जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगावा लागला आणि आजही त्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसकडून रोज चुकीचे व निर्लज्जपणाचे आरोप करण्यात येत आहेत. राहुल गांधी व अन्य नेत्यांना जनताच धडा शिकवेल. स्वा. सावरकरांनी तुरुंगवासात जे अत्याचार भोगले, त्याची या नेत्यांना कल्पना नाही. जाती व वर्णव्यवस्था संपवून हिंदू समाज एकसंघ होईपर्यंत देशावर परकीय आक्रमणे होत राहतील. हिंदूत्व हा देशाचा आत्मा असून तो मजबूत राहिला पाहिजे. हिंदूत्व ही व्यापक संकल्पना असून ती देशाच्या मातीशी, संस्कृतीशी व विचारांशी जोडली गेलेली संकल्पना आहे, अशी सावरकरांची भूमिका होती. हिंदूत्वाचा हा धागा स्वा. सावरकरांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत जोडला गेला आहे.