मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सीएसएमटी – शिर्डी आणि सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी सुरू झाली. लोकार्पणानंतर पहिल्याच रविवारी सीएसएमटी – शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या एक्स्प्रेसची १०० टक्के आसने आरक्षित झाली असून प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. तर, सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे सुमारे ८५ टक्के आरक्षण झाले आहे.
देशातील नवव्या सीएसएमटी – सोलापूर आणि दहाव्या सीएसएमटी – शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारतमुळे शिर्डी आणि सोलापूर येथील धार्मिक स्थळे आणि पर्यटकस्थळांना जोडली गेली आहे. तसेच, प्रवाशांचा आरामदायी, वेगवान प्रवास या एक्स्प्रेसमुळे होत आहे. त्यामुळे प्रवासी या दोन्ही एक्स्प्रेसमध्ये फिरून इच्छितस्थळी जाण्यास पसंती दर्शवत आहेत.
पहिल्याच रविवारी सीएसएमटी ते साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या तिकिटांसाठी बोटांवर मोजण्याइतकी तिकिटे शिल्लक होती. तर साईनगर-शिर्डी ते सीएसएमटी वंदे भारतमधील चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. तर, रविवारी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारतचे साधारण ८५ टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.