लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (शिंदे गट) उमेदवार रवींद्र वायकर जिंकले किंवा हरले, तरी त्यात माझा दोष नसून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर जिंकल्यास वडील म्हणून मला नक्कीच आनंद होईल, असे मतप्रदर्शन शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
तर शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवून ती ऐनवेळी मागे घेऊन मुलगा अमोल कीर्तिकर याला निवडून आणायचा कट कीर्तिकर यांनी रचल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तर भाजपवालेच कटकारस्थानी असल्याने त्यांची डोकी अशीच चालतात, असे प्रत्युत्तर गजानन कीर्तिकर यांनी ‘ लोकसत्ता’शी बोलताना दिले. लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच शिवसेना व भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले असून कीर्तिकर यांच्यावर शिंदे गटाकडून पक्षांतर्गत कारवाई संदर्भात विचार सुरू आहे.
हेही वाचा >>>सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण : अनुज थापनच्या अपूर्ण शवविच्छेदन अहवालाबाबत उच्च न्यायालयाची नाराजी
मतदानाच्या दिवशी कीर्तिकर हे मुलगा अमोल याच्या गाडीत होते. अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील उमेदवार आहेत. मुंबईतील मतदान पार पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांनी शिंदे यांचा एकेरी उल्लेख करून मुलगा अमोल याला विजयासाठी मतदान व आशीर्वाद दिल्याचे सांगितले आणि कीर्तिकर यांनीही ‘अमोल जिंकला, तर आनंद होईल’ असे मत व्यक्त केल्यावर शिंदे गटात धुसफुस सुरू झाली. गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्यास आपला विरोध होता, असे त्यांच्या पत्नीने नुकतेच नमूद केले. त्यामुळे कीर्तिकर यांच्या वर्तन व भूमिकेबद्दल भाजप व शिंदे गटातील नेत्यांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मला ईडीची भीती नाही किंवा खोक्यांचा संबंध नाही. शिवसेनेचा विचार अडगळीत टाकण्यात आला होता. शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० नेत्यांनी उठाव केला. त्यांची कृती मला आवडल्याने मी शिंदेंबरोबर असून मला त्यांची साथ सोडायची नाही. मी त्यांचा पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. शिशिर शिंदे ध्येयवादी नेते असून ते व मी दोघेही आपली बाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडू आणि ते उचित निर्णय घेतील, असे गजानन किर्तिकर यांनी नमूद केले. ज्यांनी आतापर्यंत शिवसेना, मनसे, आणि शिंदे गट असा पक्षबदलाचा अनुभव घेतला आहे, त्यांनी हकालपट्टीची भाषा करणे योग्य नाही, अशी टिप्पणी अमोल कीर्तिकर यांनी केली आहे.
भाजपचे नेतेच कटकारस्थानी असून दुसऱ्यावर आरोप करतात. कट करणे हे माझ्या रक्तात नाही. अमोलने निवडणूक लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले होते व तो शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाल्याने व मुलाविरोधात लढणे उचित नसल्याने मीही लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. – गजानन कीर्तिकर, खासदार.