समस्या सोडविण्याची प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नांदेड प्रकरणांनंतर राज्यातील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) कडून मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार शिवआरोग्य सेनेने नुकतेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, संत मुक्ताबाई रुग्णालय आणि गोवंडी शताब्दी, कुर्ला भाभा रुग्णालय आणि देवनार येथील प्रसूतीगृहातील विविध समस्यांच्या पाढा सर्व रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांच्याकडे वाचला. तसेच या समस्या तातडीने सोडविण्याची विनंती केली.

शिवआरोग्य सेनेने नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी, संत मुक्ताबाई आणि गोवंडी येथील शताब्दी, कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि देवनार येथील प्रसूतीगृहात भेट दिली. यावेळी या राजावाडी रुग्णालयामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे दिसून आले. संत मुक्ताबाई रुग्णालयातील औषध तुटवडा, अपुरा कर्मचारी वर्ग यामध्ये प्रामुख्याने परिचारीका, प्लंबर, लिफ्टमन, एसी मेकॅनिक यांची संख्या कमी असल्याचे लक्षात आले. तसेच नेत्र चिकित्सक व डिजीटल एक्सरे यंत्राचीही आवश्यकता असल्याचे दिसून आले. शताब्दी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी रुग्णांना येणाऱ्या अडचणी, परिचारिका व डॉक्टर यांची कमतरता आदी गोष्टी अधिक्षकांसमोर मांडण्यात आल्या.

हेही वाचा >>> पंतप्रधान आवास योजना गोरेगाव पहाडीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात

देवनार महानगरपालिका प्रसूतीगृहांमध्ये औषधे मिळत नसल्याने रुग्णांना बाहेरून आणावी लागतात. तसेच परिचारिका आणि डॉक्टरांचा तुटवडा, प्रसूतीसाठी आवश्यक साधनाची कमतरता असल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांना विविध रूग्णालयात पाठवण्यात येते. भाभा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागासाठी अपुरी जागा असल्याने रुग्णांना दाटीवाटीने उभे राहावे लागते. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व अडचणींचा पाढा शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडला.

हेही वाचा >>> मुंबई: डोक्यात लोखंडी सळी मारून २४ वर्षीय तरूणाची हत्या; आरोपीला अटक

तसेच त्यांना निवेदन देऊन या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची विनंती केली. त्यावर डाॅ. विद्या ठाकूर यांनी सकारात्मकता दर्शवत समस्या सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासनही दिले. आरोग्य विभागातील कर्मचारी, पुरवली जाणारी औषधे, साधनसामुग्री यांचा पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आपली जबाबदारी झटकून त्याचे खापर आरोग्य कर्मचाऱ्यांवर फोडले जात आहे. करोनामध्ये ज्या आरोग्य कर्मचारी अणि प्रशासकीय यंत्रणेने आपल्या जिवाची पर्वा न करता सामान्य जनतेचे जीव वाचवले त्यांच्या पाठीशी शिव आरोग्य सेना खंबीरपणे उभी असल्याचे शिवआरोग्य सेनेचे मुंबई उपनगर (पूर्व) सहसमन्वयक प्रकाश वाणी यांनी सांगितले.