मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार या योजनेचा आढावा घेत असून त्यात गैरव्यवहार झाल्याचा संशय राज्य सरकारला आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवायची की नाही, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे. ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यावर ही योजना सुरू केली होती. राज्यातील गोरगरिबांना दहा रुपयांमध्ये भोजन देण्यात येत होते.
करोनाकाळात पाच रुपयांमध्ये थाळी दिली जात होती. दररोज सुमारे दोन लाखांपर्यंत थाळय़ांचे वितरण होत असून राज्य सरकार केंद्रचालकांना प्रत्येक थाळीमागे अनुदान देत आहे. या योजनेत गैरव्यवहार होत असल्याचे या सरकारला वाटत असून अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी योजनेचा आढावा घेण्याचे निर्देश आपल्या खात्यास दिले आहेत.