हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि शिवसृष्टी मुंबईच्या किनाऱ्याजवळ भर समुद्रात उभारण्याचे वचन जाहीरनाम्यात देऊन दोन वेळा सत्तेवर आलेल्या लोकशाही आघाडी सरकारला हे स्मारक उभारताना नाकी नऊ आले आहे. राजकीय अनास्थेमुळे गेल्या १० वर्षांत शिवस्मारक उभारणीचा प्रस्ताव  केवळ चर्चा आणि फायलीतच अडून पडला आहे. आता तर आपल्याकडे तांत्रिक तज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करीत हा विषयच राष्ट्रवादीच्या ताब्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने २००२ मध्ये केली होती. त्यानंतर झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत या पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. सन २००९च्या  विधानसभा निवडणुकीच्या काही माहिने आधी स्मारकाच्या प्रतिकृतीचे मंत्रालयात अनावरणही करण्यात आले. मात्र त्यापलीकडे फारशी प्रगती झालेली नाही.
सध्याही या प्रस्तावात फारशी प्रगती झालेली नसून प्रस्तावावर केवळ चर्चा सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.   

Story img Loader