शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेला चौथरा हटवण्याच्या कारवाईला वेग आल्याच्या बातम्या पसरताच गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. आळीपाळीने शिवसैनिक पहारा देत असल्याचे दृश्य रविवारीही पाहायला मिळाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची कुमकही वाढविण्यात आली आहे.
ठाणे शहरातील शिवसैनिकांनी शनिवारी दिवसभर पहाऱ्याची जबाबदारी सांभाळली. रविवारी ठाणे ग्रामीण तसेच भिवंडीतील शिवसैनिक पहारा देण्यासाठी आले होते. पहारा देणाऱ्या शिवसैनिकांची गर्दी कमी झाली नसली तरी पहारा देणारे शिवसैनिक मात्र बदलत आहेत. ६ डिसेंबपर्यंत तुरळक असणारी शिवसैनिकांची गर्दी मागील दोन दिवसापासून वाढण्यास सुरूवात झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाध्यक्षांमार्फत आपापल्या जिल्ह्यातील शिवसैनिकांना पहारा देण्यासाठी आदेश आणि भावनिक आवाहनही करण्यात आले आहे. सरकारकडून चौथरा हटविण्याची संभावित कारवाई आणि त्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कारवाई होऊ शकते. त्यामुळे आम्हाला सज्ज राहण्याचे आदेश असल्याचे एका शिवसैनिकाने सांगितले.
न्यायालयाचे आदेश आहेत असे सांगणाऱ्या सरकारने ‘विशेष बाब’ म्हणून या गोष्टीकडे पाहावे आणि परवाणगी द्यावी, असे पहारा देण्यासाठी आलेल्या सुभाष घरत या भिवंडीतल्या शिवसैनिकाने आपली बाजू माडंली तर वेळ पडली तर मरेपर्यंत या जागेवरील एक विटही हटवू देणार नाही असे मनोज पाटील या शिवसैनिकाने सांगितले.
 स्मारकाच्या मुद्यावरून दोन पावले मागे आलेले शिवसैनिक चौथऱ्याच्या मुद्दय़ावर मात्र आग्रही झाल्याचे चित्र आहे. ज्या प्रमाणात शिवसैनिक वाढत आहेत, त्याच प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही वाढत आहे.

Story img Loader