दादरच्या वीर कोतवाल उद्यानापासून पार शिवतीर्थाच्या प्रवेशद्वारापर्यंत संपूर्ण दादरमधील रस्त्यांनी विजयादशमीच्या दिवशी भगवा रंग धारण केला होता. पावलापावलावर भगवे झेंडे, विविध वस्तूंचे स्टॉल यामुळे शिवतीर्थाच्या साऱ्या वाटांवर भगवा उत्साह प्रकटल्याचे दिसत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्याच दसऱ्या मेळाव्याला गर्दी होईल का, विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांचे जत्थे शिवतिर्थावर येतील का या सगळ्या प्रश्नांना रविवारच्या दसऱ्या मेळाव्याने खणखणीत उत्तर दिले.
जळगाव, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, तुळजापूर अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांमधून आलेल्या शिवसैनिकांच्या गर्दीने शिवाजी पार्क फुलले होते. तुळजापूरवरुन भवानी मातेची ज्योत घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी ढोल-ताशाच्या गजराने मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुरू होणाऱ्या सभेसाठी शिवसैनिकांनी दुपारी ४ पासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ‘एकच खात्री उद्धव ठाकरे’, ‘शिवसेना अंगार हैं, बाकी सब भंगार हैं’, ‘बाळासाहेब परत या’ अशा घोषणांनी शिवाजी पार्क दणाणून गेले. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याबद्दलची उत्सुकता गर्दीला होती. पण उत्साहही ओसंडून वाहात होता. खांद्यावर आपापल्या लहान मुलांना घेऊन आलेले शिवसैनिक संध्याकाळपासूनच मैदानात ठिय्या देऊन बसले होते. मधूनच शिवसैनिकांचा एखादा जत्था आल्यानंतर पुन्हा एकदा घोषणांची ललकारी होत होती. गळ्यात भगवे स्कार्फ, छातीवर शिवसेनेचा बिल्ला, कपाळावर टिळा अशा वेषातील शिवसैनिक उद्धव साहेबांच्या भाषणाकडे कान लावण्यासाठी ताटकळले होते. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटायला मिळणार नाही याची रुखरुखदेखील सर्वाना लागली होती. संध्याकाळी ७.०० च्या सुमारास शिवसेना नेत्यांची भाषणे सुरू झाली आणि शिवतीर्थ पुन्हा एकदा घोषणांनी दुमदुमून गेले.
बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये हमखास हजर राहणारे दादरमधील काही फेरीवाले मात्र आज कामातच व्यस्त होते. संध्याकाळी मैदानावर जायचे की नाही, असा संवाद काही फेरीवाल्यांमध्ये रंगला होता. बाळासाहेब नाहीत तर सभेला मजा नाही, असा एक सूर त्यांच्या चर्चेतून कानी पडत होता. तर काही जण मात्र सायंकाळी आपला पथाऱ्या आवरुन मैदानाकडे रवाना झाले.
‘जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो आणि माता भगिनींनो’, असे बाळासाहेबांचे शब्द शिवतीर्थावर घुमले, की मैदानाचा कोपराकोपरा उत्साहाने उसळू लागायचा. आज ते शब्द घुमले तरी तो आवाज मात्र ऐकू येणार नाही, अशी एक अस्वस्थ जाणीव उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सभास्थानी मध्यभागी एका मोकळ्या आसनामुळे ती अस्वस्थता तीव्र होत होती.. दसरा मेळाव्यात घुमणाऱ्या घोषणांमुळे वातावरणात चैतन्य सळसळत असे. या वेळी मात्र, चैतन्याबरोबरच उदासीनतेचे वारेही घेऊन येणारी एक घोषणा घुमत होती.. ‘बाळासाहेब, परत या!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा