रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास यांच्या निर्वाणीच्या भाषेनंतर शिवसेनेने रिपाइंला आपल्या कोटय़ातून लोकसभेची एक जागा देण्याचे मान्य केले. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत आणि आठवले यांच्यात रंगशारदामध्ये मंगळवारी उशिरा चर्चा झाली. आता भाजपने त्यांच्या कोटय़ातून लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात, अशी मागणीही आठवले यांनी केली.
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार उलथवून टाकण्यासाठी आपण शिवसेना-भाजपशी युती केली आहे. ही महायुती टिकविण्याची व भक्कम करण्याची जबाबदारी सेना-भाजपचीही आहे, याची जाणीव आठवले यांनी सेना-भाजपला पुन्हा एकदा करून दिली आहे. ऑक्टोबरअखेपर्यंत जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली पाहिजे, अशी निर्वाणीची भाषाही त्यांना आता सुरू केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन ३ ऑक्टोबरला औरंगाबाद येथे साजरा करण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी शिवसेना-भाजपकडून मिळत असलेल्या थंड प्रतिसादाबद्दल नाराजीचा सूर लावला.
गेल्या वर्षी मुंबईत वर्धापन दिन सभेला उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते; परंतु यंदा सेना किंवा भाजपच्या कोणाही नेत्यांना बोलावण्यात आलेले नाही. औरंगाबादनंतर कोल्हापूर, ठाणे व नागपूरमध्येही संकल्प मेळावे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Story img Loader