रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढत दिवा स्थानकात सुरू झालेल्या प्रवासी आंदोलनात उडी घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मदतीला शिवसेनेचे स्थानिक नेते धावले खरे, मात्र या मदतनाटय़ाआडून ठाणे जिल्ह्य़ातील भाजपच्या वाढत्या प्रभावाला धक्का देण्याचा जोरकस प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आल्याची चर्चा आता रंगली आहे. रेल्वेमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले प्रभू यांनी भाजपचे सदस्य होण्याची औपचारिकता पार पाडली.
संतप्त प्रवाशांनी रेल्वेमंत्र्यांच्या नावाचा उद्धार करत असतानाच ठाणे, डोंबिवली, कल्याणातील भाजप नेते मात्र भूमिगत झाल्याचे चित्र दिसत होते. मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रभूंची बाजू जोरकसपणे मांडत आंदोलनात यशस्वी मध्यस्थीचे श्रेय तर पदरात टाकलेच, शिवाय भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही नामोहरम करण्याची खेळी खेळली.
या आंदोलनात प्रमुख राजकीय नेते उडी घेणार नाहीत, असाच कयास सुरुवातीला बांधला जात होता. मात्र, आंदोलन ऐन भरात असताना पालकमंत्री एकनाथ िशदे आणि स्थानिक खासदार श्रीकांत िशदे शिवसेना पदाधिकाऱ्यांची कुमक घेऊन घटनास्थळी पोहचले. संतापलेल्या जमावात शिरून प्रवाशांना शांत करण्याच्या प्रयत्नात िशदे यांनाही सुरुवातीला प्रवाशांच्या रोषास सामोरे जावे लागले. त्यांना अनेक शिवसेना नेते व कार्यकर्त्यांची साथ मिळाले आंदोलन ‘शिवसेनामय’ झाल्याचे दिसत होते.
गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी दिवा स्थानकाची पाहणी केली, तेव्हा त्यांच्यासोबत भाजपचे काही नेते उपस्थित होते, तोवर शिवसेना नेत्यांनी दिव्यात दिवसभर ठाण मांडत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader