दीड वर्षांपूर्वी ‘लोकार्पण’ झालेले प्रकल्प अद्याप ‘फाईलबंद’!
आपल्या हयातीत केवळ बोटाच्या इशाऱ्यावर तत्कालीन युती सरकारला नाचविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांच्या नावाने विद्यमान सरकारमधील शिवसेनेने जाहीर केलेले दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ फाईलबंद स्थितीत रखडले आहेत. सेनेच्या दिग्गज मंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात या टेबलवरून त्या टेबलवर प्रवास करण्यापलीकडे या फायलींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने, शिवसेनाप्रमुखांच्या ‘रिमोट कंट्रोल’चा प्रभाव ओसरल्याच्या अनुभवाने सेनेचे मंत्री हताश झाले आहेत.
राज्यात १९९५ मधील सेना-भाजप युती सरकारवर बाळासाहेब ठाकरे यांची जबरदस्त पकड होती. त्यांच्या केवळ इशाऱ्यालादेखील ‘आदेश’ समजून त्याच्या पूर्ततेकरिता तेव्हाचे सरकार अक्षरश धावपळ करीत असे. आता मात्र बाळासाहेबांच्या पश्चात त्यांच्या नावाने सुरू करावयाच्या योजनांचे साधे कागदही पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल दीड वर्षांपूर्वी, जानेवारी २०१६ मध्ये समारंभपूर्वक ‘लोकार्पण’ होऊनही बाळासाहेबांच्या नावाने जाहीर झालेले दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेतच असून सेनेच्या मंत्र्यांच्या पाठपुराव्यासही लाल फितीचे फटके बसत असल्याने हे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल, अशी चिन्हे आहेत.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या नावाने चार महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली होती. जानेवारी २०१६ मध्ये त्या योजनांचा लोकार्पण सोहळादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. ‘या योजना बदलत्या महाराष्ट्राचा संदेश देणाऱ्या ठरतील’, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावेळी व्यक्त केला होता, तर, ‘या योजना प्रत्यक्षात आणणे हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल’ असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. या चार योजनांपैकी ‘बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे अपघात साहाय्यता निधी’ या दोन योजना कार्यान्वित झाल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या ३१६ मुली या योजनेच्या लाभार्थी ठरल्या असून, अपघातग्रस्त साहाय्यता निधीतून सुमारे ७५ कोटींचे अर्थसाह्य़ वितरित करण्यात आले. या योजनांसोबतच, एसटी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय’ आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषानुसार ‘बाळासाहेब ठाकरे वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय’ उभारणीच्या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचे भविष्य मात्र अंधारातच आहे.
दीड वर्षांपूर्वी ‘लोकार्पण’ झालेल्या या योजनांचे प्रस्ताव अजूनही मंत्रालयात मान्यतेच्या प्रतीक्षेतच आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित खात्यांकडे हेलपाटे घालूनही योजनांच्या कार्यवाहीस वेग आलेला नाही. या संदर्भात दिवाकर रावते म्हणाले की, आपण स्वत अजूनही या योजनांचा पाठपुरावा करीत असून रुग्णालय व महाविद्यालयासाठी जागादेखील निश्चित झाल्या आहेत. सरकारी यंत्रणांच्या प्रक्रिया पार पडून प्रस्तावांना मंजुरी मिळाली की निविदा काढून काम सुरू करता येईल.