शिवसेना आणि भाजपाने पुन्हा एकदा युती करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण तात्विक, धार्मिक किंवा निवडणुकांचे मुद्दे वगैरे मुळीच नाही. एकमेकांच्या गैरसोयीची झालेली जाणीव हे यामागचं वास्तववादी कारण आहे असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे.
गैरसोयीची जाणीव म्हणजे काय तर शिवसेना आणि भाजपा हे युतीमध्ये एकत्र राहू शकत नाहीत आणि युती केल्याशिवायही एकत्र राहू शकत नाहीत. अशात कमीत कमी गैरसोयीचा मार्ग किंवा कमी त्रासाचा मार्ग त्यांनी निवडला आणि त्यांनी युती केली आहे असेही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना सध्याच्या घडीला युतीची गरज आहे. पण भाजपापेक्षा शिवसेनेला युतीची गरज जास्त आहे कारण भाजपाचा प्रचार देशव्यापी असल्याने शिवसेनेने युती केली नसती तर या पक्षाला फुटीचा धोका होता. शिवसेनेचा एक मोठा गट भाजपाच्या गळाला लागला असता. अशात शिवसेनेचं आव्हान जास्त गहीरं झालं असतं हे वास्तव ओळखूनच शिवसेनेने भाजपासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. आपल्या ज्या काही तलवारी होत्या त्या म्यान केल्या आणि शरणागती पत्करतात त्याचप्रकारे युती केली.
पहा व्हिडिओ
महाराष्ट्रात युती झाली तर आम्हीच मोठा भाऊ असू असं शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र भाजपाने धाकटा भाऊ म्हणूनच शिवसेनेला स्वीकारलं आहे. भाजपाने असं स्वीकारण्याची अपरिहार्यताही शिवसेनेला जाणवली आहे. भाजपापेक्षा आम्हाला जास्त जागा मिळायला हव्यात ही शिवसेनेची अट होती, मुख्यमंत्री आमचा असेल ही अटही त्यांनी ठेवली होती. मात्र या कोणत्याही अटी मान्य न करता युती झाली असल्याने शिवसेनेला पूर्ण शरणागती पत्करावी लागली हे उघड आहे. वास्तविक जे राजकीय अभ्यासक आहेत त्यांनी हाच कयास बांधला होता की शिवसेनेवर अशीच वेळ येणार आणि तसंच घडलं आहे. लोकसत्ताने गेल्या वर्षी 11 फेब्रुवारीला या संदर्भातली बातमीही दिली होती. तरीही शिवसेना शुरत्त्वाचा, वीरत्त्वाचा आव आणत राहिली. अखेर त्यांना शरणागती पत्करून युती करावी लागली आहे असं मत गिरीश कुबेर यांनी मांडलं आहे.