नाराज युवा सैनिक भाजपच्या वाटेवर; निवडणुकीच्या तोंडावर सेनेला धक्का?
शिवसेना युवराजांच्या सभोवताली गोळा झालेले परप्रांतीय मित्रांचे कोंडाळे, उच्चभ्रूंवर लक्ष केंद्रित करताना सर्वसामान्य शिवसैनिकांकडे झालेले दुर्लक्ष, ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांकडून सतत केला जाणारा पाणउतारा आणि मनसेला रामराम ठोकत शिवसेनेची वाट धरणाऱ्याच्या हाती दिली जाणारी शिवसेनाप्रणीत संघटनांची सूत्रे आदी विविध कारणांमुळे युवा सेनेमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. युवा ब्रिगेडच्या कार्यकारिणी सदस्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे युवा सेनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून युवा सेना फुटीच्या उंबरठय़ावर आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसैनिक ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ करीत आले आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी १०० टक्के राजकारण करायला हवे, असे वक्तव्य करीत शिवसैनिकांना धक्काच दिला होता. तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्याबद्दल शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला होता. अखिल भारतीय सेना बरखास्त करून स्थापलेल्या युवा सेनेची सूत्रे आदित्य ठाकरे यांच्या हाती देण्यात आली. परंतु युवा नेतृत्वाशी होत नसलेला संपर्क, बडव्यांकडून केल्या जाणाऱ्या सूचना, मर्जीतील व्यक्तींची वाढलेली अरेरावी, अध्यक्षांच्या अमराठी मित्रांची सांभाळावी लागणारी मर्जी अशा विविध कारणांमुळे युवा सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रणीत ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रक-टेम्पो, बसेस, अवजड वाहने, पर्यटन वाहने, माथाडी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आणि कामगार संघटना बरखास्त करून मनसेमधून शिवसेनेत दाखल झालेले हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखालील शिव वाहतूक सेनेमध्ये विलीन करण्यात आल्या. बरखास्त झालेल्या संघटनांतील पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात फेसबुकवर नाराजी व्यक्त करणाऱ्या युवा ब्रिगेडचे कार्यकारिणी सदस्य अमर पावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर युवा सेनेतील असंतोष उफाळून आला आहे. तसेच युवा सेनेच्या वॉटस्अॅप ग्रुपमधून काही युवा सैनिकांना बाहेरची वाट दाखविण्यात आली असून युवा सेनेमध्ये फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अमर पावले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आणखी काही युवा सेनेतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या बेतात आहेत.
युवा सेनेत कडक शिस्तीने काम सुरू आहे. काही स्वार्थी लोक निवडणुकीच्या दृष्टीने इतर पक्षात उडय़ा मारत असतील तर शिवसेना अशा दलबदलूंना किंमत देत नाही. शिवसेना व युवासेनेची रचनात्मक घोडदौड सुरू आहे. अमर पावले यांच्याविषयी तक्रारी आल्या होत्या. म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
-अरविंद भोसले, प्रवक्ता, शिवसेना
निवडणुकीच्या काळात पक्षांतर होत असते. आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेत शिस्त आणली आहे. युवा सेना गावागावात पोहोचली आहे. निवडणुकीच्या महत्त्वाकांक्षेपोटी कुणी पक्ष सोडून जात असतील तर त्यांना जाऊ दे. मात्र, कोणी नाराज असले तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू.
-मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना
दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्यांमुळे जुन्या शिवसैनिकांची मानहानी होत आहे. माथाडी सेना वाढविण्यासाठी खास्ता खाल्ल्यानंतर राजकारणाचा गंधही नसलेल्यांची मर्जी सांभाळावी लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना हा प्रकार कदापि सहन होणार नाही.
-अमर पावले