सत्तेचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या शिवसेना- भाजपातील अंतर्गत कुरापती आता वाढू लागल्या आहेत. राज्यातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी यापुढे वनविभागाकडून होणाऱ्या वृक्षतोडीवरही लक्ष्य ठेवण्यात येणार असून किती झाडे तोडली आणि किती नवी झाडे लावली यांची माहिती देण्याचे फर्मान पर्यावरण विभागाने वनविभागास धाडले आहे. त्यामुळे भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वनविभागाच्या कारभारात शिवसेनेचे रामदासभाई कदम यांच्या पर्यावरण विभागाने हस्तक्षेप करण्यास सुरूवात केल्याने नव्या वादास तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने शंभर दिवसांचा टप्पा पार केला असला तरीही या दोन्ही पक्षांचा कारभार मात्र नदीच्या दोन पात्रांप्रमाणे सुरू आहे. मुळातच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वाटय़ाला थेट जनतेशी संपर्क असणारी आणि जनक्षोभाचे चटके बसणारी खाती आली असून मलईदार खाती मात्र भाजपाने स्वत:कडे ठेवल्याने सेनेच्या मंत्र्यामध्ये नाराजी आहे. त्यातच आता सेनेच्या मंत्र्याशी संबधित विषयाबाबतही मुख्यमंत्री परस्पर निर्णय घेऊ लागल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यामुळे आता जशास तसे वागण्याचे धोरण शिवेसेनेच्या मंत्र्यांनी घेतले असून त्याची सुरूवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्याची चर्चा मंत्रालयात सुरू झाली आहे.
राज्यातील पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या विभागाची जबाबदारी असून नदी नाल्यांचे ७० टक्के प्रदूषण हे महापालिका आणि नगरपालिकांच्या सांडपाण्यामुळे होत आहे. त्याचबरोबर वनविभागाकडूनही कधी प्रकल्पांच्या नावाखाली तर कधी अन्य कारणाने वृक्षतोड केली जाते. त्यामुळे
पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून यापुढे किती झाले कशासाठी तोडली आणि त्याच्या बदल्यात किती झाडे लावली गेली याची तपशील द्यावा अशा सूचना वनविभागास देण्यात आल्याचे रामदास कदम यांनी सांगितली. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या या भूमिकेवर आता वनविभाग कोणती भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे. वन आणि पर्यावरण हे दोन्ही विभाग स्वतंत्र असून दोन्ही विभाग पर्यावरण संवर्धनाचेच काम करतात. मात्र पर्यावरण विभागाने घेतलेल्या नव्या भूमिकेबद्दल वन विभागाकडे अजून प्रस्ताव आलेला नसून तो प्राप्त झाल्यानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल असे वन विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.