सर्वसामान्यांसाठी ११ लाख परवडणारी घरे.. ठाण्याजवळ नवीन व्यापारी संकुल यासारख्या नव्या घोषणांद्वारे ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवणाऱ्या युती सरकारने आता किनारपट्टी रस्त्यावरून (कोस्टल रोड) नरिमन पॉइंट ते बोरिवलीतील गोराईपर्यंत सुखद वातानुकूलित प्रवासासाठी मेट्रो रेल्वे बांधण्याचे नवे स्वप्न मुंबईकरांना दाखवले आहे. किनारपट्टी रस्त्यावरून मेट्रोबरोबरच बस सेवेसाठी विशेष मार्गिका ठेवत ‘बीआरटीएस’ राबवण्याचीही सरकारचा मानस आहे.
दक्षिण मुंबई व उपनगरांना जोडणाऱ्या प्रस्तावित सागरी किनारपट्टी मार्गाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे दिसू लागताच आता या मार्गाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी या रस्त्याचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पर्यावरण मंत्रालयाने सागरी किनारपट्टी नियमन कायद्यात सुधारणा करताच या प्रकल्पाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
गोराई ते नरिमन पॉइंट दरम्यान सागरी किनारपट्टी मार्ग बांधण्याची मुंबई महापालिकेची योजना असून, राज्य सरकारनेही या प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र किनारपट्टी नियमन कायद्यात (सीआरझेड) सुधारणा केल्याशिवाय किनारी मार्ग करणे शक्य नसल्याने या कायद्यात बदल करण्याची मागणी राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे. मात्र भरती रेषा हलविणार नाही आणि किनाऱ्यावर बांधकाम करणार नाही या अटींच्या अधीन राहून किनारी मार्गाला हिरवा कंदील दाखविण्याची तयारी पर्यावरण मंत्रालयाने दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यात झालेल्या चर्चेतून सीआरझेड कायद्यातून किनारी मार्गाला परवानगी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार तब्बल आठपदरी रस्ता, त्यापैकी चार मार्गिका वाहनांसाठी, दोन मार्गिका ‘बेस्ट’च्या बससाठी आणि दोन मार्गिका मेट्रो रेल्वेसाठी असा बेत सरकार आखत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा