महापालिका निवडणुकीत ‘करून दाखविले’ची जाहिरातबाजी करीत सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजपने मुंबईकरांवर पाणी दरवाढही ‘लादून दाखविली’ आहे. १६ जूनपासून सर्वसामान्य मुंबईकरांचे पिण्याचे पाणी महागणार असून प्रतिहजार लिटर पिण्याच्या पाण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना जादा २४ पैसे, तर सर्वसामान्य मुंबईकरांना ३२ पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर मलनि:स्सारण आकारातही वाढ होणार आहे. इतकेच नव्हे तर आता दरवर्षीच पाणीपट्टीत आठ टक्क्यांची वाढ मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.
नगरसेवकनिधी, विकासनिधीला कात्री लावणारे पालिकेचे माजी आयुक्त सुबोध कुमार यांनी वाढता खर्च भरून काढण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपट्टीत दरवर्षी आठ टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. या अर्थसंकल्पाला शिवसेना-भाजपने मंजुरी दिली होती. त्यावेळी विरोधी पक्षांकडूनही त्यास फारसा विरोध झाला नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना दरवर्षीच पाणी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेने घरगुती पाणीवापरासाठी दोन गट केले आहेत. एका गटात झोपडपट्टीवासीय, तर दुसऱ्या गटात चाळी-सोसायटय़ांचा  समावेश आहे. सध्या महापालिकेकडून झोपडपट्टीवासीयांना प्रतिहजार लिटर पाण्यासाठी ३ रुपये, तर सर्वसामान्य मुंबईकरांना ४ रुपये मोजावे लागत होते. आता त्यांना अनुक्रमे ३ रुपये २४ पैसे आणि ४ रुपये ३२ पैसे भरावे लागणार आहेत.
व्यावसायिक वापरासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्यासाठी संस्था, उद्योगधंदे आणि कारखान्यांना प्रतिहजार लिटर पाण्यासाठी ४३ रुपये २० पैसे, तर रेसकोर्स आणि थ्रीस्टार हॉटेल्सना ६४.८० रुपये भरावे लागणार आहेत.
यापूर्वी व्यावसायिक वापरासाठी आणि रेसकोर्स-थ्रीस्टार हॉटेलसाठी अनुक्रमे ४० रुपये व ६० रुपये दराने प्रतिहजार लिटर पाणी पुरविण्यात येत होते. पाणीपट्टीच्या नव्या दरावर ६० टक्के मलनि:स्सारण आकार वसूल करण्यात येणार आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीत ७३.४४ कोटी रुपयांची भर पडणार आहे. दरम्यान, मीटर भाडे, सुरक्षा ठेव, इतर आकार आणि शुल्कात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
सुबोध कुमार यांनी चलाखी करीत दरवर्षी पाणीपट्टीत आठ टक्क्यांनी वाढ करण्याचा आणि त्यावर ६० टक्के मलनि:स्सारण कर आकारण्याचे अर्थसंकल्पातच प्रस्तावित केल्यामुळे आता दरवाढीच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता राहिलेली नाही. केवळ स्थायी समितीच्या शुक्रवारी होत असलेल्या बैठकीत केवळ सदस्यांच्या माहितीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा