देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीमुळे मुंबईकरांचा जीव गुदमरत आहे. मात्र गेली २० वर्षे पालिकेत सत्ता उपभोगणारे शिवसेना-भाजप या प्रश्नावर केवळ परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते पर्यटनस्थळी जावेत अशा आविर्भावात कचराभूमीला भेट देत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात हयगय करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मुंबईकरांची माफी मागावी आणि या प्रकरणी करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नि:पक्षपाती समिती स्थापन करावी, तसेच या समस्येवर तात्काळ श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी केली.
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या रविवारी देवनार कचराभूमीला भेट दिली. त्या वेळी पर्याय सुचविण्याऐवजी ते शिवसेनेवर टीका करण्यात मग्न होते. सोमवारी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कचराभूमीला भेट दिली. त्यांनीही कचराभूमीत छायाचित्रे काढून घेत भाजपवर चौफेर टीका केली. या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी शिवसेना-भाजप अंतर्गत राजकारणात वेळ वाया घालवत आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. या कचराभूमीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. पण मुख्य विषयाला बगल देण्याचे काम दोन्ही पक्षांकडून केले जात आहे. या सर्व आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी या वेळी केली.
पालिकेला मुंबईतील कचऱ्याचे व्यवस्थापन डोईजड झाले असून पालिका प्रशासन सामान्य मुंबईकरांच्या आरोग्याकडे डेळेझाक करीत आहे. कचराभूमीच्या आसपास ४० चौ. कि.मी. क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांच्या श्वसनासंबंधीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. शहरातील इतर भागांच्या तुलनेत येथे बालमृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी अधिक आहे. कचराभूमीतून बाहेर पडणारे लिचॅट पिण्याचे पाणी, माशांना प्रदूषित करीत आहे. पूर्वेकडील उपनगरे आधीच समस्येने त्रस्त आहेत. या समस्येवर तोडगा शोधला नाही तर संपूर्ण शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होईल. सत्ताधाऱ्यांची हयगय व दुर्लक्ष मुंबईच्या मुळावर उठेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader