पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात टाळाटाळ न करता आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी आज भाजपला सुनावले. मात्र त्याचवेळी पंतप्रधानपदासाठी सेनेची पसंती सुषमा स्वराज यांना असली तरी त्याबाबत एक पाऊल मागे येण्याची तयारीही उद्धव यांनी दाखवली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएने घोळ घातल्यामुळेच शिवसेनेने युपीएचे उमेदवार प्रणवकुमार मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याकडेही उद्धव यांनी लक्ष वेधले. बाळासाहेबांनी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांचे नाव सुचवले होते. तुमच्याकडे दुसरे कोणते नाव असेल तर ते पुढे आणा त्यावर बोलता येईल, अशी भूमिका घेऊन प्रसंगी एक पऊल मागे येण्याचीही तयारीही त्यांनी दाखवली आहे. पुढच्या एप्रिल अथवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार हे जर निश्चित आहे तर एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यात दिरंगाई कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जे करायचे आहे ते लवकर करा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जसा घोळ घातला तस घालू नका, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला आहे.
राज यांना टोला
शिवसेनेत साहेब एकच, बाळासाहेब. मी शिवसैनिकांमधीलच एक आहे. साहेब असल्याचा आव मी कधीही आणणार नाही आणि उगाचच बाळासाहेबांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणार नाही, असा टोला उद्धव यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख न करता लगावला.