ठाणे येथील तीन हात नाका परिसरातील इटरनिटी मॉलच्या शेजारीच असलेल्या आरक्षित जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे दहा कोटी ७३ लाख रुपये खर्च येणार आहे. या स्मारकाचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार येत्या दोन वर्षांत या स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. या स्मारकाजवळच पिरॅमिडच्या आकाराची काचेची इमारत उभारण्यात येणार असून त्यात एकाच वेळी चार प्रदर्शने भरविता येऊ शकणार आहेत. तसेच या वास्तूमध्ये अ‍ॅम्पी थिएटरच्या धर्तीवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इटरनिटी मॉलच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या सुविधा भूखंडावरील सुमारे सहा हजार चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्याचे रेखाचित्र ठाण्यातील वास्तुविशारद राजेंद्र गोडबोले आणि त्यांची पत्नी मृणालिनी यांनी तयार केले आहे. त्यासाठी या दाम्पत्याने कोणतेही शुल्क घेतलेले नाही. सहा हजार चौरस मीटर जागेत पिरॅमिडच्या आकाराची एक इमारत उभारण्यात येणार असून ती पूर्णपणे काचेचा वापर करून तयार करण्यात येणार आहे. या इमारतीत परिषद सभागृह, ध्यानधारणा व योगासाठी जागा, कला प्रदर्शन आदीचा समावेश असणार आहे. पिरॅमिड आकाराच्या या इमारतीशेजारीच तळ अधिक दोन मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर व्यंगचित्र दालन आणि कलादालन तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयक्तिक व प्रासंगिक छायाचित्रे पाहावयास मिळणार आहेत. तसेच पुस्तके आणि भाषणांच्या सीडीज् उपलब्ध होणार आहेत. तसेच दुसऱ्या मजल्यावर पुस्तकांची मोठी अभ्यासिका आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या बाजूला ४११३ चौरस मीटर जागेत आकर्षक लॉन तयार करण्यात येणार असून त्याचबरोबर सुरक्षा चौकी, तिकीट घर आदी असणार आहे.
या स्मारकामध्ये बाळासाहेबांच्या वस्तूंचेही संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. तसेच अ‍ॅम्पी थिएटरच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या कलादालनामध्ये चित्रकार, मूर्तीकार आदी आपली कला थेट लोकांपुढे सादर करू शकणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या येणाऱ्या कलावंतांसाठीही दोन विशेष अतिथिगृह उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिली.

Story img Loader