रेसकोर्ससह २३४ भूखंडांचे नूतनीकरण रखडले
पालिकेने भूखंडाच्या मक्त्याच्या नूतनीकरणाचे धोरण सुधार समितीत मंजूर करणाऱ्या भाजपला पालिका सभागृहात शिवसेनेने धक्का देत धोरणाचा प्रस्ताव फेटाळून लावला. महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर थिम पार्क साकारण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न असून रेसकोर्सच्या मक्त्याचे नूतनीकरण होऊ नये म्हणून प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळून लावत मक्ता नूतनीकरणाचे घोंगडे भिजत ठेवले आहे.
महापालिकेचे मुंबईमध्ये ४,१७७ भूखंड असून त्यापैकी ३,३९६ भूखंड विविध संस्था, मंडळे, शासकीय-निमशासकीय मंडळांना मक्त्याने देण्यात आले आहेत. त्यापैकी १,२४७ भूखंड कायमस्वरूपी, २,१४८ भूखंड ९९९ वर्षांसाठी, तर १ भूखंड १२० वर्षांसाठी देण्यात आले आहेत. यापैकी २३४ भूखंडांचा मक्ता संपुष्टात आला असून त्यामध्ये महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या भूखंडाचाही समावेश आहे.
पालिकेने भूखंडांच्या मक्त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी नवे धोरण आखले आहे. या धोरणाच्या प्रस्तावाला निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळावी यासाठी भाजपची धडपड सुरू होती. प्रशासनाने सुधार समितीमध्ये या धोरणाचा प्रस्ताव सादर केला होता. शिवसेनेकडून त्यास विरोध होण्याची चिन्हे होती. मात्र सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे शिवसेना नगरसेवकांचे मन वळविण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी सुधार समितीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे खवळलेल्या ‘मातोश्री’ने शिवसेना नगरसेवकांची खरडपट्टी काढली होती. सत्ताधारी शिवसेनेने बुधवारी पालिका सभागृहाची विशेष बैठक बोलावून या धोरणाचा प्रस्ताव चर्चेला आणला होता. ‘मातोश्री’चा रोष ओढवू नये म्हणून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावावर चर्चा न करताच तो फेटाळण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर यांनी हा प्रस्ताव पुकारला आणि तो फेटाळून लावला. सभागृहात बसलेल्या भाजपच्या नगरसेवकांना प्रस्ताव कधी फेटाळला हे कळलेदेखील नाही. रेसकोर्सच्या भूखंडाच्या मक्त्याचे नूतनीकरण होऊ नये म्हणून शिवसेनेकडून ही खेळी खेळण्यात आली. आता पालिका निवडणुकीनंतरच या धोरणाचा विचार होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मुद्दा वादग्रस्त ठरणार?
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता महापौर बंगल्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी सरकारी मालमत्तांचे स्मारकांमध्ये रूपांतर करण्यात येऊ नये, या आदेशानुसार केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या बंगल्याचे स्मारकात रूपांतर करण्यास परवानगी नाकारली होती.
कोणत्याही सरकारी मालमत्तांचे नेतेमंडळींच्या स्मारकांमध्ये रूपांतर करण्यात येऊ नये, असा आदेश केंद्र सरकारने २०१४ मध्ये काढला होता. माजी पंतप्रधान चरणसिंग यांचे स्मारक आपल्या सरकारी निवासस्थानामध्ये करावे, यासाठी माजी केंद्रीय मंत्री अजित सिंग आग्रही होते. तेव्हा चरणसिंग यांच्या स्मारकाकरिता परवानगी नाकारताना केंदाने तसा आदेश काढला होता. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या १०, राजाजी रोडवरील बंगल्याचे स्मारकात रूपांतर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण केंद्र सरकारने नियमावर बोट ठेवले होते.
नव्या महापौरांचा निवास राणीच्या बागेजवळ
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून पालिका निवडणुकीनंतर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणाऱ्या प्रथम नागरिकाच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) प्रमुखांसाठी आरक्षित असलेल्या टुमदार बंगल्यामध्ये करण्यात येणार आहे.विद्यमान नगरसेवकांची नगरसेवकपदाची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. तोपर्यंत स्नेहल आंबेकर यांना महापौर बंगल्यात वास्तव्य करता येणार आहे.