पारदर्शी कारभाराच्या मुद्दय़ावर शिवसेनेने भाजपला सुनावले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे दूरदृष्टी आहे. आगामी काळात सत्तेत आल्यानंतर भाजप हिंदुत्व गुंडाळून ठेवणार, नोटाबंदी करून सव्वाशे कोटी लोकांना वेठीला धरणार, मुठभर धनदांडग्यांवर कारवाई करणार नाही, एवढेच नव्हे तर आंध्र प्रदेशच्या राजभवनात नसते उद्योग करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांना सन्मानाने भाजपत घेणार, काँग्रेसमुक्तीचा नारा देत काँग्रेसयुक्त भाजप करणार आणि गुंडांना भाजपत मोकळे रान देणार. हेच का भाजपचे वेगळेपण व संघाची शिकवण, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. गुंडांना सन्मानाने घेता आणि पारदर्शक कारभाराच्या कसल्या गप्पा मारता अशा शब्दात राऊत यांनी भाजपला फटकारले.
भाजपने यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या व नोटांच्या गादीवर झोपणाऱ्या सुखराम यांनाही पावन करून घेतले होते. आता ज्या नारायण दत्त तिवारी यांच्या विरोधात भाजपने रान उठवले होते त्यांना दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पावन करून घेतले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल असे शहा यांचे म्हणणे आहे. मात्र नेमक्या कोणत्या अनुभवाचा उपयोग होणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. भाजपच्या गंगेत आल्यास सारे गुंड-पुंड व भ्रष्टाचारी राजकारणी पावन होत असावेत असे अमित शहा यांना बहुतेक वाटत असावे. कोणत्याही प्रकारे व कशाही प्रकारे सत्ता मिळवणे एवढेच भाजपचे ध्येय झाले असावे असे दिसते. ज्या हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर देशातील सत्तेचा सोपान भाजपने गाठला तो आता अरबी समुद्रात बुडवून टाकला आहे. समान नागरी कायदा, राम मंदिर, ३७० कलम, गोरक्षा आदी सारेच मुद्दे आता विकासाचे गाडगे-मडके वाजवत गुंडाळण्यात आले आहेत. भाजपने आता गुंडांना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना घेण्याचा सपाटाच लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व दाखलेबाज व दगाबाज ‘कमल निवासी’ होत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
संघाच्या धुरीणांना हे मान्य नसल्यामुळेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देऊन झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपला जागे करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. शेवटी कसाही असला तरी भाजप आमचा मित्र आहे, म्हणूनच जागे करण्याच्या संघाच्या प्रयत्नात आम्हीही साथ देत असल्याचा ‘रोखठोक’ पवित्रा त्यांनी घेतला.