दुपारी ३ चा सुमार.. उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता.. भायखळ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक मार्गावरुन कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे राणीच्या बागेच्या दिशेने सरकत होते.. भायखळ्याचा परिसर कामगारांच्या गर्दीने ओसंडून वाहू लागला.. खांद्यावर भगवा झेंडा, लाल बावटा घेऊन सरकारविरोधी घोषणा देत कामगारांचा मोर्चा राणीच्या बागेकडून आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि कष्टकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडले.
वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशींचा फेरविचार करावा, ३७ महिन्यांची महागाई भत्त्याची फरकाची थकबाकी भविष्य निर्वाहनिधीमध्ये जमा करावी, शासकीय रुग्णालयातील सेवांचे खासगीकरण बंद करावे, सरकारी कार्यालयांमधील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावे, सर्व कामगारांना निवृत्ती वेतन, कामगारांना १०,००० रुपये किमान वेतन द्यावे, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगिकरण थांबवावे, कंत्राटी पद्धत बंद करावी आदी विविध मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने २० आणि २१ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सरकारला वेळीच जाग यावी यासाठी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भायखळा येथील राणीच्या बागेपासून आझाद मैदानावर लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. एरवी परस्परांविरुद्ध लढणाऱ्या कामगार संघटना यानिमित्ताने एकत्र आल्या होत्या. या लाँग मार्चच्या निमित्ताने कामगार संघटनांमधील एकजुटीचे दर्शन मुंबईकरांना घडले. भगवा झेंडा, लाल बावटा खांद्यावर मिरवित, कामगार एकजुटीचा जयजयकार करीत कष्टकऱ्यांच्या मोर्चा आझाद मैदानावर रवाना झाला. गिरण्यांच्या जमिनींवर घर मिळविण्यासाठी धडपडणारे गिरणी कामगारही मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेनाप्रणित कामगार संघटनांतील कार्यकर्तेही सरकारविरोधी घोषणा देत आझाद मैदानावर रवाना होत होते. महापालिका, बेस्टमधील कर्मचारीही मोठय़ा संख्येने आझाद मैदानात उपस्थित होते.  भगवे झेंडे आणि विविध कामगार संघटनांचे लाल बावटे मैदानात एकत्र डौलत होते. वक्त्यांच्या भाषणाला दात देत मोर्चेकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते.
   

Story img Loader