महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी रेसकोर्सवर उद्यान तयार करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावावर पसंतीची मोहर न उमटविल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेच्या पालिकेतील शिलेदारांनी गेले काही दिवस पद्धतशीरपणे प्रशासनावर हल्ला चढविण्याचे काम चालविले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे तसेच खराब मैदानांच्या मुद्दय़ावरून सर्वप्रथम अतिरिक्त पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडील सर्व खात्यांच्या चौकशीची मागणी केली तर आरोग्य विभागातील उपकरणांच्या खरेदीचा मुद्दा उपस्थित करत अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याकडून आरोग्य विभागाचे कामच काढून घेण्याची मागणी केली आहे.
कुंटे यांनी राज्य शासनाकडे रेसकोर्सबाबत पाठविलेल्या अहवालात तेथे उद्यान बनण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. मात्र थेट आयुक्तांवर हल्ला करणे आजघडीला शक्य नसल्याने अतिरिक्त आयुक्त व प्रशासनावर टीकेच्या तोफा डागण्याचे काम सध्या सेनेच्या नगरसेवकांकडून सुरू आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डय़ांमुळे दरवर्षी शिवसेनेला लोकांची टीका सहन करावी लागते. त्यातून यंदा अतिरिक्त आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनाच शिवसेनेने स्थायी समितीत टार्गेट केले. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी तर गुप्ता यांच्याकडील सर्व खात्यांची चौकशी करण्याची मागणी केली. शेवाळे यांनी दोन वर्षांपूर्वी आयटी विभागाच्या कामाची श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र प्रशासनाने त्यांच्या आदेशाला किंमत दिलेली नाही.
या पाश्र्वभूमीवर बुधवारी शेवाळे यांनी जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संदर्भात श्वेतपत्रिका देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मोडकळीला आलेल्या जुन्या इमारतींमधून रहिवाशांना बाहेर काढण्याच्या प्रश्नावर बिल्डरांशी अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोपही स्थायी समितीत करण्यात आला. इमारती कोसळून अनेकांचे बळी जात असताना सत्ताधाऱ्यांकडून सुरू झालेल्या या नव्या आरोपांमुळे प्रशासनातील उच्चपदस्थांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे.
गेली तीन वर्षे पावसाळ्यातील साथींच्या आजाराचा पालिकेने केलेला मुकाबला, केईएम, सायन व नायर रुग्णालयांची उपनगरीय रुग्णालयांशी संलग्नता, पालिका रुग्णालयांचा पुनर्विकास तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी अनेक नावीन्यपूर्ण योजना आखल्या. मलेरिया निर्मूलनाच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर पालिका रुग्णालयांमध्ये डायलिसीसच्या रुग्णांसाठी नव्याने सुविधा निर्माण केल्या असून मुंबईच्या आरोग्याला चेहरा देण्याचे काम करणाऱ्या म्हैसकर यांच्याकडून उपकरण खरेदीत दिरंगाई होत असल्याचा मुद्दा पुढे करत आरोग्य विभागच काढून घेण्याची मागणी पुढे आल्यामुळे शिवसेना विरुद्ध प्रशासन असा ‘सामना’ आता सुरू झाला आहे. आगामी काळात आयुक्त कुंटे यांना ‘राम राम’ ठोकण्याचे काम होऊ शकते असे मत काही ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा