मुंबई महापालिका सभागृहात मंगळवारी उद्भवलेल्या रणकंदनास कारणीभूत असलेल्या स्वपक्षाच्या नगरसेविकांना वाचविण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पालिका अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचे जुने प्रकरण उकरून शिवसेनेने आयुक्तांच्या माध्यमातून काँग्रेस नगरसेविकेला निलंबित करण्याची मागणी सरकार दरबारी पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविकांवर कारवाई व्हावी यासाठी काँग्रसनेही तयारी सुरू केली आहे.
रेसकोर्सवरील ठरावाच्या सूचनेवर चर्चा करण्याची मगाणी विरोधकांकडून करण्यात आली होती. महापौर सुनील प्रभू यांनी त्यास नकार देताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौरांना बांगडय़ांचा आहेर देताच शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांनी त्यांना मारहाण केली. काही महिन्यांपूर्वी शीतल म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्यास गेलेल्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. अनधिकृत बांधकाम तोडण्यास अटकाव करणे, अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी सभागृह नेते यशोधर फणसे यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. हे पत्र पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठविण्यात आले असून संपूर्ण माहिती मिळवून पुढील कारवाईसाठी ते नगर विकास खात्याकडे पाठवावे असे आयुक्तांना सांगण्यात आल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.

‘.. त्या कंत्राटदारांना पैसे देऊ नका’
प्रतिनिधी, मुंबई<br />नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून होत आहेत. त्यामुळे नालेसफाई योग्य पद्धतीने न करणाऱ्या कंत्राटदारांना बिले अदा करू नयेत, असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी दिले आहेत. मुंबईमधील अनेक नाल्यांची सफाईच झालेली नाही, असा आरोप समाजवादी पार्टीचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी केला.
 नालेसफाईबाबत नगरसेवक मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करीत आहेत. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नाले तुंबत आहेत. यावरुन नालेसफाई योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे नगरसेवकांच्या तक्रारींची
शहानिशा करा आणि मगच कंत्राटदारांना पैसे द्या, असे आदेश सुनील प्रभू यांनी दिले.