मुंबई क्रिकेट असोसिएशनने पालिकेच्या अटी-नियमांना हरताळ फासून कांदिवलीच्या महावीर नगरातील भूखंडावर मोठय़ा प्रमाणावर बांधकाम केले आहे. हा भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशनने विकसित करण्यासाठी परस्पर बी. जी. शिर्के कंपनीला दिला. त्यामुळे या भूखंडाबाबतचा मूळ प्रस्ताव पुन्हा चर्चेला आणून असोसिएशनची कोंडी करण्याची व्यूहरचना शिवसेनेकडून आखण्यात आली आहे.
उपनगरातील तरुणांना क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने एमसीएला कांदिवलीचा हा भूखंड दिला होता. तेथे क्रिकेटपटूंसाठी तंबू, प्रसाधनगृह, शौचालय उभारण्याची परवानगी होती. प्रत्यक्षात एमसीएने हा भूखंड ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर बी. जी. शिर्के कंपनीला दिला. आता या कंपनीला सदस्य नोंदणीचेही अधिकार दिले आहेत. असोसिएशनने पालिकेच्या अटी-नियमांचा भंग केल्यामुळे भूखंड हस्तांतरणाचा मूळ प्रस्ताव पुन्हा सुधार समितीमध्ये चर्चेला आणावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक संपत ठाकूर यांनी केली. या भूखंडावर केवळ १५ टक्के बांधकामाची परवानगी होती. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनने तेथे ३३ टक्के बांधकाम केले आहे, असा मुद्दा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी  उपस्थित केला. अखेर संपत ठाकूर यांनी केलेल्या मागणीस मंजुरी देत सुधार समिती अध्यक्ष राम बारोट यांनी याबाबतचा प्रस्ताव पुन्हा चर्चेसाठी सादर करण्यात आदेश दिले.