कल्याण डोंबिवली पालिकेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये जुंपली. शिवसेनेचे स्थायी समितीचे माजी सभापती मल्लेश शेट्टी यांनी सेनेचेच विद्यमान सभागृह नेते रवींद्र पाटील यांना धक्काबुक्की करीत बेफाम शिवीगाळ केली. अन्य पक्षांच्या नगरसेवकांनी शेट्टी यांना अडवून धरल्याने सभागृहातील हाणामारीचा प्रसंग टळला. या घटनेने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
कल्याण पूर्व भागातील पाणी प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू होती. अनेक नगरसेवक पोटतिडकीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर बोलत होते. मनसेच्या नगरसेविका सुनीता घरत यांनी पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यावर तोफ डागली. हे अधिकारी नगरसेवकांना फक्त खोटी आश्वासने देतात. प्रत्यक्ष कृती काहीही करीत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी, शिवसेनेचे सभागृह नेते रवींद्र पाटील व त्यांचे सवंगडी खाली माना घालून हसत-खिदळत होते. ही बाब शिवसेनेचे कल्याण पूर्व भागाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी महापौर कल्याणी पाटील यांच्या निदर्शनास आणली.
शेट्टी यांनी सभागृह नेत्याचे सभागृहातील वर्तन किती जबाबदारपणाचे असणे गरजेचे आहे आणि ते आता कसे वागतात याविषयी टिप्पणी केली. पाटील यांनी शेट्टी यांना खाली बसण्याची खूण करताच संतप्त झालेले शेट्टी वेगाने पाटील यांच्या दिशेने आले आणि त्यांना हाताच्या धक्क्याने जोराने मागे लोटले. पाटील आणि शेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असताना शेट्टी तीन ते चार वेळा रवींद्र पाटील यांना मारण्यासाठी धावले. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना अडवून धरल्याने सभागृहातील हाणामारीचा प्रसंग टळला. या घटनेमुळे सर्व पक्षीय नगरसेवकांनी खासगीत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक महिला नगरसेविका या घटनेनंतर थेट घरी निघून गेल्या.
आयुक्त शंकर भिसे यांनी महासभेच्यावेळी सभागृहात हजर असणे आवश्यक असताना दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून स्वत: मंत्रालयात बैठकीचे निमित्त करून पळ काढल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सभागृहात कोरम नसल्याने सभा तहकूब करावी अशी सूचना केली. सभागृहात ११२ नगरसेवकांपैकी फक्त २३ नगरसेवक उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यावर महापौर कल्याणी पाटील यांना शिवसेना-भाजपची पालिकेत सत्ता असतानाही सभा तहकूब करावी लागली.
उल्हासनगर पालिकेत महापौरपदावरून गोंधळ
शुक्रवारी महासभा सुरू होताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांना लक्ष्य करून पालिकेला पोलीस छावणीचे रूप का दिले आहे? नगरसेवकांना मते मांडण्याचा अधिकार नाही का? ते दहशतवादी आहेत का? असे प्रश्न विचारून सभागृहात गोंधळ घातला. अडीच वर्षे होऊन गेली तरी सत्ताधारी पक्षाच्या महापौर आशा इदनानी ठरलेल्या निर्णयाप्रमाणे महापौरपद सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या महासभेतील अनुभव लक्षात घेऊन शुक्रवारच्या महासभेला ५०० पोलीस, तीन राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, पोलीस उपायुक्त पालिकेला वेढा घालून उभे होते.  महासभा सुरू होताच ही महासभा आहे की लष्करी छावणी आहे, असे प्रश्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित करून सचिवांच्या समोरील माईक व व्हिडीओ कॅमेरा तोडला. महापौरांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना सभागृहात येण्याचे आदेश दिले.

Story img Loader