पक्षाने व्हीप काढलेला असतानाही जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीस नगरसेविका मानसी दळवी अनुपस्थित राहिल्यामुळे शिवसेनेची विजयाची संधी हुकली. या प्रभागात राष्ट्रवादी-मनसे युती झाली होती. परंतु मनसेच्या नगरसेवकाचे मत बाद झाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची मते समसमान होऊन चिठ्ठीद्वारे अध्यक्षपदाचा निर्णय झाला असता. त्यात शिवसेनेचा विजयही झाला असता. पण दळवी अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेचा खेळ आटोपला.
जी-दक्षिण प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे चार, मनसेचे दोन, तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. गेल्या वर्षी जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेचे संतोष धुरी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी तिखट टीका केल्यामुळे या वेळी राष्ट्रवादी-मनसे युतीबाबत साशंकता होती. मात्र अखेरच्या क्षणी मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर यांना या वेळी राष्ट्रवादीने जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मनसेच्या पाठिंब्यामुळे सुनील अहिर यांचा विजय जवळजवळ निश्चित होता. परंतु संतोष धुरी यांचे मत बाद झाले आणि सुनील अहिर यांच्या पारडय़ात चार मते पडली. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाकावर मानसी दळवी अनुपस्थित होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांना केवळ तीन मते मिळाली. मानसी दळवी उपस्थित राहिल्या असत्या तर वरळीकर-अहिर यांना समसमान मते मिळाली असती. त्यामुळे चिठ्ठीचा कौल घेऊन अध्यक्ष निवडावा लागला असता. त्यात वरळीकर यांचाही विजय होऊ शकला असता. परंतु, तसे न झाल्याने सुनील अहिर एका मताने आघाडी घेऊन विजयी झाले.

Story img Loader