डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांचे भोईरवाडी विभागातील जनसंपर्क कार्यालय पालिकेच्या अनधिकृत बांधकाम पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले.
गेल्या तीन वर्षांपासून हे कार्यालय तोडण्यावरून पालिका, शासन पातळीवर तक्रारी करण्यात आल्या होत्या.
याबाबत लोकायुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेऊन, हे कार्यालय तोडण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते. कार्यालय न तोडल्यास लोकायुक्तांसमोर प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे प्रभाग अधिकारी लहू वाघमारे, उपअभियंता लोहार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली हे एक मजली सुशोभित शिवसेना कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले.
गुरूवार संध्याकाळपासून हे कार्यालय तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पालिकेत शिवसेनेची सत्ता, शिवसेनेचा महापौर असताना ही कारवाई झाल्याने शिवसेनेत नाराजी व्यक्त होत होती. नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या विरोधकांनी याबाबत शासनपातळीवर तक्रारी केल्या होत्या. शहरप्रमुख प्रभाकर चौधरी यांच्याशी संपर्क साधला, पण ते या कारवाईविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
म्हात्रे यांचे कार्यालय असलेल्या जागेचा मूळ मालक नागो म्हात्रे नावाची व्यक्ती आहे. या जागेचे कब्जेदार म्हात्रे कुटुंबीय होते. या बांधकामावर यापूर्वी एमआरटीपी कारवाई करण्यात आली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांनी दिली.
या जागेवर गेले अनेक वर्षांपासून आपला कब्जा आहे. तक्रारदार व्यक्तीने आपली तक्रार मागे घेतली होती. केवळ आपण भूमाफिया, नळजोडणी घोटाळासारखी प्रकरणे बाहेर काढल्याने त्याचा राग काढण्यासाठी अडचणीत आलेल्या पालिकेतील काही झारीतील शुक्राचार्यानी आपल्याला दुखावण्यासाठी ही कारवाई केली आहे, असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा