न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करूनही कारवाई नाही; २७ कोटी रुपये उकळल्याचा गुन्हा
उद्योजकाकडून कधी व्यवसायाच्या नावाने तर कधी धमकावून तब्बल २६.९५ कोटी रुपये उकळल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातूनही अटकपूर्व जामीन रद्द होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभयामुळे शिवसेनेचे ठाण्यातील नगरसेवक रवींद्र फाटक स्वातंत्र्य उपभोगत आहेत. फाटक यांना अटक करणे तर सोडाच ‘अटक का झाली नाही’ असे विचारणाऱ्या वरिष्ठांनाही तपास अधिकारी दाद देत नसल्याचे चित्र आहे.
सिंधुदुर्गाच्या सातेली गावात विदर्भ मायनिंग प्रा. लि. ही संस्था खाणकाम करत होती. रवींद्र फाटक यांनी विदर्भ मायनिंगचे संचालक प्रेमप्रकाश सरोगी यांच्याशी संपर्क साधून सिंधुदुर्गात माझी ओळख असून तुमची मनुष्यबळाची अडचण सोडविण्यासाठी मदत करेन, असे सांगितले. डिसेंबर २००८ साली विदर्भ मायनिंग कंपनीने फाटक यांना व्यावसायिक सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यानंतर सप्टेंबर २०१२ साली फाटक यांनी सरोगी यांच्याशी संपर्क साधून आणखी खाणी शोधण्याच्या कामासाठी तुषारकुमार पांचाळ यांना संस्थेच्या संचालक मंडळावर नियुक्त करण्यास सांगितले. नोव्हेंबर २०१२ मध्ये फाटक यांनी पुन्हा ५० टक्के नफा देण्याची मागणी केली, अन्यथा खाणकाम बंद पाडण्याची धमकी दिली. अखेर जानेवारी २०१३ मध्ये संस्थेने ठराव करून फाटक आणि पांचाळ यांना संचालक मंडळावरून काढून टाकले. तसेच, सरोगी यांनी खंडणी उकळणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे अशा कलमांतर्गत वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
त्यापूर्वी सन २०११ मध्ये फाटक यांनी सरोगींना बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी पुनामिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कापूरबा अ‍ॅण्ड कंपनी यांच्याशी भेट घडवून आणली आणि पाचपाखाडी आणि माजिवडा भागातील २० कोटींच्या जमिनीसाठी १३ कोटी कंपनीच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. पुढे फाटक यांनी कापूरबा अ‍ॅण्ड कंपनीच्या खात्यावर जमा केलेले १३ कोटी रुपयेही घेतले.
२०१३ मध्ये फाटक यांनी सरोगी यांच्याशी वाटाघाटी करून वनराई पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घेतल्यास २६ कोटी रुपये परत करण्याची तयारी दर्शविली. फाटक यांनी तीन कोटी १५ लाख रुपये सरोगी यांना परतही केले. त्यानंतर फाटक यांनी पैसे परत केलेच नाही, उलट त्यांनी सरोगी यांना धमकाविण्यास सुरुवात केली. माजिवडय़ाच्या भूखंडावरील अतिक्रमण काढण्यासाठी सरोगी यांच्याकडून पुन्हा ७५ लाख रुपये फाटक यांनी ते स्वत: भागीदार असलेल्या ओम श्री साई कन्स्ट्रक्शनच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारे फाटक यांनी सरोगी यांच्याकडून २६ कोटी ९५ लाख रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरून पैसे परत मिळणार नाही अशी धमकीही दिली.
अखेर सरोगींनी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०१५ रोजी तक्रार दाखल केली. यानंतर अटकपूर्व जामिनासाठी फाटक यांनी सत्र, उच्च इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्व ठिकाणी त्यांचा जामीन फेटाळला गेला तरीही अटक झालेली नाही.

Story img Loader