राऊत-घोसाळकरांचा स्वबळाचा आग्रह नडला; ताकद दाखवल्याचा सेनेचा दावा
मुंबई : मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलला आव्हान देण्याऱ्या शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. सर्व २१ जागा भाजपकडे गेल्या आहेत. भाजपने देऊ केलेल्या काही जागा नाकारून आमदार सुनील राऊत आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी अधिक जागांचा आग्रह धरला व पराभव पदरात पडला, अशी अवस्था शिवसेनेची झाल्याचे चित्र आहे.
मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या (एमडीएचएफ) २१ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली. जवळपास २२ हजार गृहनिर्माण संस्था या फेडरेशनच्या सभासद आहेत. मात्र अनेक कारणांमुळे केवळ ३५०० संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या. पैकी जवळपास ३०१७ संस्थांनी मतदान केले.
भाजपने आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. आमदार प्रसाद लाड, नंदू काटकर, शिवाजी नलावडे आदी दरेकर यांच्यासोबत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे लोकही भाजपसोबत होते. शिवसेनेने शिवप्रेरणा पॅनेल स्थापन करून भाजपला आव्हान दिले होते. शिवप्रेरणा पॅनेलवर आमदार सुनील राऊत, माजी आमदार विनोद घोसाळकर, खासदार अरविंद सावंत आदी काम करीत होते. प्रामुख्याने सुनील राऊत आणि घोसाळकर रणनीती ठरवत होते. रविवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्व २१ जागा जिंकत शिवसेनेचा धुव्वा उडवला.
काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला सोबत घेणाऱ्या भाजपच्या सहकार पॅनेलला सत्ता सहकारी असणाऱ्या शिवसेनेचे वावडे का, असे विचारता प्रसाद लाड म्हणाले की, ही निवडणूक राजकीय करण्यात आमदार दरेकर यांना रस नव्हता. त्यांनी सर्वाना सोबत घेण्याचे धोरण आखले होते. त्यानुसार शिवसेनेलाही पाच जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. आपण स्वत: शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या संपर्कात होतो, पण त्यांनी प्रस्ताव फेटाळला आणि जवळपास दुप्पट जागा मागितल्या. आम्ही पाचपेक्षा आणखी थोडय़ा जागा वाढवून दिल्या असत्या, पण सुनील राऊत आणि घोसाळकर हे हट्ट सोडायला तयार नव्हते. त्यामुळे युती झाली नाही. शिवसेनेची ताकद तेवढी नाही. आता तर निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही यावरून ते सिद्ध झाले.
‘विजय भाजपचा नव्हे, ही तर सरमिसळ’
हा विजय भाजपचा नव्हे तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा सर्व पक्षांच्या मिळून तयार झालेल्या सरमिसळीचा विजय आहे, असा टोला आमदार सुनील राऊत यांनी लगावला. भाजपने आम्हाला चार-पाच जागा देऊ केल्या होत्या, पण ते शक्य नव्हते. सन्मानजनक अशा नऊ जागा मिळाल्या असत्या तर आम्ही भाजपचा समेटाचा प्रस्ताव स्वीकारला असता. आताही भाजपच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकूण वैध मतांपैकी १४५०च्या आसपास मते मिळाली आहेत, तर शिवसेनेला १२५०च्या आसपास मते मिळाली आहेत. आम्ही जागा जिंकू शकलो नसलो तरी आमची ताकद दाखवली आहे, असे आमदार सुनील राऊत म्हणाले.