महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांच्या हितासाठी अहोरात्र झुंजलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा विधान भवनाच्या आवारात उभारावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांनी तसे लेखी पत्र सभापती शिवाजीराव देशमुख यांना दिले आहे.
विधान भवनाच्या परिसरात राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक व विलासराव देशमुख यांचे पुतळे उभारण्याचे प्रस्तावित आहे असे समजते. मात्र मराठी माणसांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचाही पुतळा उभारून राज्य शासनाने त्यांचा यथोचित मरणोत्तर सन्मान करावा, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली आहे.
अधिवेशनाच्या आधीच मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी मनसेने केली होती. त्या वेळी मौन धारण करणाऱ्या शिवसेनेने आता बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. त्यावर मनसेची भूमिका काय राहणार हेही औत्सुक्याचे ठरणार आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत उद्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे असे कळते. त्यात शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या पुतळ्याचा आग्रह धरला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा