मुंबई : वरळी येथे शिवसेना उपनेत्याचा मुलगा मिहिर शहा (२४) याच्या मोटारीने दिलेल्या धडकेत मच्छिविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. कावेरी नाखवा (४५) असे त्यांचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे धडक दिल्यानंतर मिहिरने कावेरी यांनी दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले व पळ काढला. पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘लुक आऊट सर्क्युलर’ जारी केले असून मुलाचे वडील राजेश शहा व त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील पोर्श अपघातानंतर मुंबईतही तशीच घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कावेरी या वरळी कोळीवाड्यात राहात होत्या. पती प्रदीप यांच्याबरोबर त्या रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे मासे आणण्यासाठी गेल्या होत्या. वरळीकडे येत असताना सकाळी ५.२५ वाजता शिंदे गटाचे उपनेते राजेश यांचा मुलगा मिहीर याच्या मोटरीने नाखवा दाम्पत्याला मागून धडक दिली. प्रदीप बॉनेटवर आपटून डाव्या बाजूला पडले. तर कावेरी समोर पडल्या. आरोपीने मोटार भरधाव वेगात सुरूच ठेवली व कावेरी यांना फरफटत नेले. त्याने जोरात ब्रेक लावल्यानंतर कावेरी रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. त्यांना तसेच सोडून आरोपीने वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून पलायन केले. यावेळी राजेश यांचा चालक राजऋषी बिडावत बाजूच्या सीटवर बसला होता. कलानगर परिसरात आरोपीने मोटरगाडी व राजऋषीला सोडून पळ काढला. कावेरी यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथ डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा >>>ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे अतोनात हाल

फरफटत नेल्यामुळे त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. राजेश शहा व बिडावत यांना वरळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर अटक केली. मिहिरला पळून जाण्यात मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शहा यांचा बांधकामासाठी कच्चा माल पुरवण्याचा व्यवसाय आहे. ते पूर्वी ठाकरे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर ते शिंदे गटात गेले. मिहिर अपघातावेळी दारूच्या अमलाखाली असल्याचा संशय आहे. जुहूतल्या बारमध्ये त्याने माध्यप्राशन केले होते व १८ हजारांचे बिल केल्याचे समोर आले असून पोलीस त्यादिशेने पडताळणी करीत असून सीसीटीव्ही चित्रीकरणाचीही मदत घेतली जात असल्याचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी स्पष्ट केले. आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्याविरोधात ‘लुक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले आहे. देशातील सर्व विमानतळे व परदेशी बंदरांवर नोटीस पाठविण्यात आली आहे.

हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही. सर्वांना कायदा एकच आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. जे होईल ते कायदेशीररित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. – एकनाथ शिंदे</strong>मुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena deputy leades son mihir shah hit a couple with a car in worli mumbai amy
Show comments