गेल्या २५ वर्षांपासून अधिक काळ असलेली मुंबई महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्याचे शिवसेनेपुढे यंदा कडवे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि भाजपचे आव्हान असा दुहेरी आव्हानांचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. त्यातूनच यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नसणार हे मात्र निश्चित.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेच्या १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली होती. तेव्हा मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेला लाभ झाला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप तेव्हा शिवसेनेने केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या एका वक्तव्याचा शिवसेनेला फायदा झाला होता. तेव्हा मुंबई तोडण्याचा कोणाचा डाव असेल तर हाणून पाडा, असे विधान वसंतदादा पाटील यांनी केले होते. शिवसेनेला सत्ता मिळाली आणि छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर झाले होते. तेव्हा भुजबळ यांनी ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ ची घोषणा दिली होती. १९९० मध्ये महापालिकेची मुदत संपली पण तत्कालीन सरकारने दोन वर्षे नगरसेवकांना मुदतवाढ दिली होती. १९९२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. काँग्रेस-रिपब्लिकन आघाडी सत्तेत आली होती.

मुंबई महापालिका आणि शिवसेना हे एक समीकरण –

१९९५ मध्ये राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका ही अधिक महत्त्वाची होती. यामुळेच सत्तेत येताच शिवसेनेने महापालिकेची सत्ता कशी ताब्यात येईल याकडे लक्ष दिले. फोडाफोडी करून काँग्रेस व अन्य पक्षातील नगरसेवकांना गळाला लावून १९९६च्या महापौर निवडणुकीत शिवसेनेचे मिलिंद वैद्य हे महापौरपदी निवडून आले होते. तेव्हापासून म्हणजेच १९९६ पासून लागोपाठ २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे अधिराज्य राहिले. अगदी मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपून प्रशासकाची राजवट येईपर्यंत मुंबई महापालिका आणि शिवसेना हे एक समीकरण तयार झाले.

लागोपाठ पाच महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला सत्ता –

१९९७, २००२, २००७, २०१२, २०१७ अशा लागोपाठ पाच महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली. २००७ मध्ये काँग्रेसने शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले होते. तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष गुरुदास कामत यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच या निर्धाराने प्रयत्न केले होते. पण काँग्रेसमधील गटबाजी, मतांचे झालेले विभाजन यातून शिवसेनेने सत्ता कायम राखली होती.

भाजपने महापालिका शिवसेनेला आंदण दिली –

२०१७ मध्ये राज्याच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र होते. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती होऊ शकली नाही. तेव्हा भाजपबरोबर युतीत २५ वर्षे सडली, असे विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. शिवसेना आणि भाजपमध्ये कडवी झुंज झाली होती. शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. उभयतांमध्ये फक्त दोनचे अंतर होते. राज्याच्या सत्तेत भाजपला शिवसेनेची गरज असल्याने भाजपने महापालिका शिवसेनेला आंदण दिली होती.

शिवसेनेला महापालिकेतून सत्ताभ्रष्ट करण्याचा भाजपचा निर्धार –

यंदा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला महापालिकेतून सत्ताभ्रष्ट करण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा सोपिवण्यात आले. अध्यक्षपदी नियुक्ती होताच आगामी मुंबईचा महापौर भाजपचा, अशी घोषणा शेलार यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. मुंबईतील खासदार-आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. माजी नगरसेवक अजून तरी शिंदे गटात गेलेले नाहीत. पण पुढील दोन महिन्यांत चित्र काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही.

मुंबईतील रस्ते, पायाभूत सुविधा यावरून नागरिकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया ऐकू येत नाही. २५ वर्षे शिवसेना सत्तेत आहे. मुंबईचे प्रश्न आहेच तसेच आहेत, असा सार्वत्रिक सूर ऐकू येतो. शिवसेनेला नेहमी मराठीच्या मुद्द्याने हात दिला. भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पण तेवढी प्रतिक्रिया उमटली नाही. महापालिका निवडणुकीला अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत मराठी व अन्य मुद्दे पुढे येऊ शकतात.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनाच सूत्रे हाती घ्यावी लागणार –

शिवसेनेसाठी यंदा कठीण काळ आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनाच सारी सूत्रे हाती घेऊन मुंबईभर भ्रमंती करावी लागणार आहे. २०१७ मध्ये भाजपचे आव्हान असतानाही शिवसेना एकसंघ होती. या वेळी तसेही वातावरण नाही. एकूणच सत्तेची रौप्य महोत्सवी कारकीर्द पूर्ण करणाऱ्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena faces a tough challenge to maintain its 25 year rule in mumbai mumbai print news msr