मनसेला महायुतीत घ्यावे यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे घायाळ झालेल्या शिवसेनेने भाजप नेत्यांच्या या ‘अ-राज’कीय उद्योगांचा जोरदार समाचार घेतल्यानंतरही बुधवारी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णभुवनवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्धव ठाकरेच याबाबत भूमिका घेतील, असे सेनेच्या एका नेत्याने सांगितले.
‘चौथ्या गडय़ाची गरज नाही, त्यामुळे खिचडी बेचव बनू शकेल’, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या व महाआघाडीत सामावून घेण्यासाठी त्यांची मनधरणी करणाऱ्या भाजप नेत्यांना झोडपण्यात आले आहे. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर यापुढे मनसेबाबतचा निर्णय शिवसेनाच घेईल, असे गोपीनाथ मुंडे व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीरही करून टाकले. भाजप नेते सातत्याने मनसेची मनधरणी करत असल्याचा विपरित परिणाम महायुतीवर होऊ शकतो हे लक्षात घेऊन शिवसेनेने ‘टाळी’ला ‘टाळा’ लावण्याची रणनीती आखली.
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. यावेळी शायना एन.सी. यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते. मात्र ही भेट राजकीय नसल्याची सारवासारव फडणवीस यांनी केली. आपण अध्यक्ष बनल्यानंतर सर्वच पक्षांच्या प्रमुखांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आपण राज यांना भेटलो असून याचा अन्य अर्थ काढू नका, असे त्यांनी सांगितले.