आपल्या राज्यातील मराठी भाषकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कंपनीला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने विविध प्रकारचे साबण पुरविण्याचे कंत्राट बहाल केले. मराठी भाषकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारवर आसूड ओढणाऱ्या शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पश्चात कर्नाटकी कंपनीवर कंत्राटाची खैरात केल्याबद्दल पालिका वर्तुळात संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीने मात्र मौन बाळगणे पसंत केले.
पालिका कर्मचाऱ्यांसाठी १९ लाख ९१ हजार रुपयांचा स्नानाचा, ६२ लाख २० हजार रुपयांचा धुण्याचा, तर १ कोटी २१ लाख ६८ हजार रुपयांचा काबरेलिक साबणाचा पुरवठा करण्याचे कंत्राट सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कर्नाटक सोप्स अ‍ॅण्ड डिर्टजट लिमिटेड या कर्नाटक सरकारच्या कंपनीला बहाल करण्यात आले. पालिकेने साबणांच्या पुरवठय़ासाठी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस्, रेकीट बेनस्किसर, प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल, बंगाल केमिक्ल्स, डिग्रेमोंट प्रोजेक्ट, मोनोकेम इंडस्ट्रिजने निविदा भरल्या होत्या. यापैकी डिग्रेमोंट प्रोजेक्ट आमि मोनोकेम इंडस्ट्रिजच्या निविदांमध्ये अटी आणि शर्तीचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे या कंपन्या बाद ठरल्या. उर्वरित कंपन्यांमधील लघुत्तम देकार असलेल्या कर्नाटक सोप्स अ‍ॅण्ड डिर्टजट लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकार तेथील मराठी भाषकांवर अतोनात अन्याय करीत आहे. या विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठविला होता. तेथील मराठी भाषकांच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र आता त्यांच्या पश्चात पालिकेतील शिवसेनेने कर्नाटकमधील सरकारच्या कंपनीला साबणाचा पुरवठा करण्याचे कंत्राट बहाल केले आहे. याबद्दल मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे पदाधिकारी एकीकडे मराठीच्या अस्मितेच्या गप्पा ठोकत आहेत आणि दुसरीकडे मराठी भाषकांवर अन्याय करणाऱ्यांना कंत्राटे देऊन त्यांना आर्थिक रसद पुरवित आहे, असा आरोप दिलीप लांडे यांनी केला. मात्र मनसेचा विरोध डावलून स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी हे कंत्राट कर्नाटक सोप्स अ‍ॅण्ड डिर्टजट लिमिटेडच्या झोळीत टाकले.

Story img Loader