टीकेची संधी न देण्यासाठी विशेष समितीत सहभागी करून घेण्याची खेळी

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील धारावी, बीडीडी चाळी, जुन्या मोडकळीला आलेल्या घरांचे प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनासह रखडलेले गृहनिर्माण धोरण आणि एफएसआयच्या वाटपावरून सरकारवर पलटवार करण्याची संधी शिवसेनेला मिळू नये यासाठी गृहनिर्माण धोरण आणि विकास आराखडय़ासाठी नेमलेल्या ‘विशेष समिती’त खुबीने शिवसेनेलाही सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुंबईमध्ये मध्यमवर्गीयांना पंधरा लाखांत घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासाठी जमिनीचे भाव शून्यावर आणल्यास परवडणारी घरे बांधता येतील, असा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या अधिवेशनात आमदारांचे मत जाणून घेऊन गृहनिर्माण धोरण तीन महिन्यांत जाहीर करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यालाही आता बराच काळ लोटला आहे. विशेष म्हणजे, केवळ आठच आमदारांनी या धोरणाबाबत आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात कळविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. धारावीमध्ये ४५० चौरस फूट घराची मागणी शिवसेनेने केली होती. प्रत्यक्षात जागतिक निविदा काढूनही धारावी पुनर्विकास योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. विमानतळ परिसरातील झोपडीवासीयांचे आहे तेथेच पुनर्वसन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील १५०० प्रस्ताव आजही रखडले असून शिवशाही प्रकल्पाला म्हाडाकडून पाचशे कोटी रुपये दिल्यानंतर जे विकासक उभे राहिले त्यांनी घरांच्या किमती तीस लाख रुपये किमान येतील, असे सांगितल्यामुळे त्याही बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

म्हाडाच्या घरांच्या किमती पन्नास लाख रुपये तर बीबीडी चाळीसह जुन्या मोडकळीला आलेल्या घरांसाठी ३३ (७)अंतर्गत आजपर्यंत निर्णय होऊ शकलेला नाही. मुंबई शहरातील उपकरप्राप्त जुन्या इमारतींचा विकासही क्लस्टर योजना आणूनही रखडलेला आहे.

महापालिका निवडणुकीत यावरच बोट ठेवून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले तर त्याचा मोठा फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठय़ा चतुराईने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षां’ भेटीदरम्यान दोन्ही पक्षांची गृहनिर्माण धोरण आणि विकास आराखडय़ासाठी ‘विशेष समिती’ स्थापन करण्याचे जाहीर करून टाकले.

शिवसेना फसली -निरुपम

मुख्यमंत्र्यांच्या मायाजालात शिवसेना फसल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. मुळातच विकासासाठी मुंबईत जमीन पुरेशी उपलब्ध नाही. सरकारकडे पैसे नाहीत. विहिरीत अडकलेला कोल्हा बाहेर पडण्यासाठी बोकडाला विहिरीतील पाणी किती गोड आहे असे सांगत विहिरीत उतरण्यास भाग पाडतो तसेच मुख्यमंत्र्यांनी सेनेबरोबर समिती स्थापन करून केल्याचे संजय निरुपम म्हणाले.

‘मामा’ बनविले -नांदगावकर

एकीकडे राक्षसाला बाटलीत बंद करण्याची घोषणा करायची तर दुसरीकडे ‘विशेष समिती’ स्थापन करून सेनेला ‘मामा’ बनवायचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

सेनेचे स्थान काय? -नवाब मलिक

मुळात सत्तेत असलेल्या मंत्र्यांनाच काही महत्त्व नाही तेथे या विशेष समितीत शिवसेनेला काय स्थान असणार, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ज्यांना गेल्या दोन वर्षांत उभे करता आले नाही ते मुंबईतील गरिबांच्या घरांचे प्रश्न काय सोडवणार, असा सवालही मलिक यांनी केला.

Story img Loader