शिवसेनेच्या सत्तेतील समावेशामुळे भाजपच्या मुंबई, ठाणे आणि कोकणातील अनेक नेत्यांच्या मंत्रीपदाच्या आशा संपुष्टात आल्या असून पुढील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीही त्यांच्या पदरी निराशाच येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या मंत्र्यांच्या यादीत विदर्भाचा वरचष्मा असून शिवसेनेने मुंबईकर नेत्यांना अधिक संधी दिली आहे. भाजपने निवडणुकीतील आयारामांनाही डावलले असून ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांना टक्कर देणाऱ्या दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
गेली २५ वर्षे शिवसेनेशी युती असल्याने मुंबई, ठाणे आणि कोकणातील भाजप नेत्यांना निवडणुकीची फारशी संधी मिळत नव्हती, पण युती तुटल्याने अनेकांना ती मिळाली. मुंबई व ठाणे जिल्ह्य़ात भाजपने शिवसेनेपेक्षाही पुढे जात १५ जागा पटकावल्या. रत्नागिरी आणिसिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मात्र भाजपला खातेही उघडता आले नाही. तरीही विनय नातू, बाळ माने अशा काही नेत्यांची नावे मंत्रिमंडळातील समावेशासाठी चर्चेत होती.  मुंबई व ठाणे जिल्ह्य़ात चांगले यश मिळवूनही भाजपने विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर यांना आतापर्यंत मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मुंबई व ठाण्यातील अनेक भाजप आमदारांना मंत्रीपदासाठी इच्छा होती, मात्र भाजपने विदर्भालाच झुकते माप दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे, राजकुमार बडोले, महाराज अंबरीश अत्राम, रणजित पाटील आणि प्रवीण पोटे हे भाजपचे १० पैकी पाच मंत्री विदर्भातील आहेत. मात्र धनगर, तेली, अनुसूचित जाती-जमाती अशा विविध जातींतील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

शिवसेनेचे मुंबईला प्राधान्य
शिवसेनेने मुंबई, ठाणे व कोकणाला प्राधान्य दिले असून दिवाकर रावते, सुभाष देसाई, डॉ. दीपक सावंत, रामदास कदम, एकनाथ शिंदे, रवींद्र  वायकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शिवसेनेतही मंत्रीपदांवरून बरीच रस्सीखेच झाली आणि मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली. प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आलेली नाही.

आयारामांना स्थान नाही
भाजपने डॉ. विजयकुमार गावित किंवा अन्य पक्षातील आयाराम नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. निवडणुका जिंकण्यासाठी अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यात आले. त्यावर जोरदार टीका झाल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांना टक्कर देणाऱ्या दीपक केसरकर यांना मात्र शिवसेनेने मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मराठवाडय़ातून केवळ पंकजा मुंडे आणि आता विस्तारात बबनराव लोणीकर यांनाच स्थान मिळाले आहे. एकेकाळचे मुंडे समर्थक आणि विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांची मंत्रीपदाची संधीही हुकली आहे.

विरोधी-मित्रपक्ष व अधिकाऱ्यांचीही दांडी
शपथविधी समारंभाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अनुपस्थिती नजरेत भरत होती. भाजपबरोबर असलेल्या घटकपक्षांपैकी रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे हे समारंभाला आले होते. स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी मात्र समारंभाकडे पाठ फिरविली. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव प्रवीण परदेशी, प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामल मुखर्जी असे काही मोजकेच अधिकारी समारंभास उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे स्मरण
शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन करुन आणि काही मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करुन ईश्वरसाक्ष शपथ घेतली. शिवसेनेचे सर्व मंत्री आणि भाजपचे गिरीश बापट यांनी भगवे फेटे परिधान केले होते. ‘झाले शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार, राज्यात आले महायुतीचे सरकार’ हा फलक शपथविधी समारंभाच्या प्रवेशद्वारात लावण्यात आलेला होता व त्यावर शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र होते. भाजपचे राजकुमार बडोले यांनी शपथ घेण्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, तर राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण केले.