महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि रहाणार अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. मातोश्रीवर आज शिवसेना खासदारांची बैठक पार पडली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. २५ वर्षांपासून आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाकडून युतीसंदर्भात किंवा जागावाटपासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेना खासदारांची बैठक मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी कोणत्या अदृश्य हातांची मदत तुम्ही घेणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला, त्यावर राऊत म्हटले, राजकारणात अनेक अदृश्य हात असतात मात्र बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण निधड्या छातीचं आहे. कोणत्याही अदृश्य हातांची मदत आम्ही घेणार नाही आम्हाला त्याची गरज वाटत नाही. शिवसेना खासदारांची बैठक पार पडली यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी काय करायचं यावर विचार विनिमय झाला. आम्ही इथे भाजपाच्या प्रपोजलची वाट पहात बसलेलो नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात ८ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्त्पन्नावर कर लावू नका अशी विनंती शिवसेनेतर्फे केली जाणार आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader