मुंबई : शिवसेना मुस्लिमांविरोधात नसून आमच्या सरकारचा सर्वाना समान न्याय आहे. मुंबई-ठाण्यात आम्ही मंदिरांबरोबरच मशिदीही वाचविल्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले. राज्यात महिनाभरात मुस्लीम महिलांच्या २८०० बचत गटांना मान्यता दिली जाणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.
शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक विभागाचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी सईद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मेळाव्यात बोलताना शिंदे म्हणाले, सर्व धर्माचा आदर करावा, अशीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यांचे विचार घेऊनच राज्य सरकार वाटचाल करीत आहे. शिवसेना मुस्लिमांविरोधात नसतानाही काही जण मतांच्या राजकारणासाठी गैरसमज निर्माण करीत आहेत.
अनेक मुस्लीम नेते बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते, युती सरकारमध्ये साबीर शेख मंत्रीही झाले. अब्दुल सत्तार यांना आम्ही मंत्री केले आहे. मुस्लिमांनीही शिवसेनेला साथ दिली आहे. संभाजीनगरच्या जागेवर सत्तार यांच्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मुस्लिमांची १२० मते मिळाली. मी ठाण्यात सभागृह नेता असताना कब्रस्तानसाठी शासकीय जमीन मिळवून दिली. काँग्रेसने वर्षांनुवर्षे केवळ आश्वासनेच दिली होती. हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच असते. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे एकूण बारा हजार रुपये देत आहे. दोन्ही सरकारच्या योजनांमध्ये हिंदू-मुस्लिम भेद नाही. सर्वाना लाभ मिळत आहे. मदरशांसाठी वार्षिक दोन लाख रुपये अनुदान, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले.
‘माझ्यामुळे अनेक जण घराबाहेर पडले’
मला काहीही नशिबामुळे मिळाले नसून मी अतिशय मेहनत घेतो. नशिबाने एखादे वेळीच फळ मिळते, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उल्लेख न करता लगावला. माझ्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले.