भारताला पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेता येत नसेल तर प्रजासत्ताकदिनी राजपथावर करण्यात येणारे शस्त्र प्रदर्शन कुचकामी ठरेल, अशी सणसणीत टीका शिवसेनेकडून सरकारवर करण्यात आली आहे. बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते, असे सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे. याशिवाय, नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्या लाहोर भेटीवरदेखील या अग्रलेखातून शरसंधान साधण्यात आले आहे. शरीफ यांच्याबरोबरचे चहापान हा आमच्या पंतप्रधानांचा खासगी विषय आहे. चहाच्या बदल्यात पठाणकोटला सात जवानांनी मरण पत्करले. त्या वीर जवानांची कुटुंबे आक्रोश करीत आहेत. हे वीर का शहीद झाले? देशाला प्रश्न पडला आहे. हे हौतात्म्य का झाले? जवान वीरमरण पत्करत आहेत, पण देश लढत आहे काय? उत्तर द्या!, असा थेट सवाल सेनेने मोदींना विचारला आहे.
‘फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे. हवाई दलाच्या पंजाबमधील पठाणकोट येथील तळावर मूठभर दहशतवादी जोरदार हल्ला करतात आणि ७२ तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा आहे’ असे सांगत सेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.