Dasara Melava 2022 : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी गाव-खेड्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने दादरमध्ये रवाना होऊ लागले आहेत. शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे वाजतगाजत शिवाजी पार्कच्या दिशेने जाऊ लागले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जयघोष करीत, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील घोषणांनी दादर दुमदुमून गेले होते.
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि खासदारांनी वेगळी चूल मांडून शिवसेनेवर दावा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचे पडसाद दसरा मेळाव्यावर उमटू लागले आहेत. शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने शिवसैनिक दुपारपासून दादरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. कोकण, मराठवाड्यातील शिवसैनिकांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत शिवसैनिक सेना भवनाच्या परिसरात जमत होते. त्यानंतर हळूहळू शिवसैनिकांचे जत्थे शिवाजी पार्कमध्ये दाखल होत होते. अनेक शिवसैनिक स्वखर्चाने मुंबईत आले होते. जेवणाच्या व्यवस्थेची काहीच कल्पना नसल्याने ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिकांनी सोबत मिठभाकर आणली होती. दुपार होताच शिवाजी पार्कमध्ये मिठभाकर खाऊन शिवसैनिक मेळावा सुरू होण्याची प्रतीक्षा करीत होते.
दरवर्षीप्रमाणे यंदा वांद्रे येथील कलानगरातील शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाजवळून शिवाजी पार्क मैदानावर मिरवणुकीने जाण्यास शिवसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे वारकरी, डॉक्टर आदींचा समावेश असलेली दिंडी दादरमधून शिवाजी पार्क मैदानात रवाना झाली. विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषेत असलेल्यांच्या पाया पडण्याचा मोह अनेक शिवसैनिकांना आवरत नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती भगव्या वस्त्रांमध्ये शिवसेना भवनाबाहेर येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्याच वेळी अनेक नेते मंडळीही तेथे येऊ लागली होती.
शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण, भगव्या टोप्या आदींची विक्री करणारे स्टॉल्स मांडण्यात आले होते. अनेक शिवसैनिक तेथे बिल्ले, भगव्या टोप्या आदींची खरेदी करीत होते. एकूणच वातावरण शिवसेनामय झाले होते.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गाड्यांचं बुकिंग करावं लागत नाही. राज्यभरातून शिवसैनिक स्वःखर्चाने आणि निष्ठेने येत आहेत. शिवाजी पार्कचे मैदान आताच भरायला सुरुवात झाली आहे, संध्याकाळी अभूतपूर्व दसरा मेळावा पाहायला मिळेल. – अनिल देसाई, शिवसेना सचिव