सत्तेची ऊब मिळाल्याने जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका बासनात?

युतीचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणारी शिवसेना आता भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाल्यावर डाळी, कडधान्ये, कांदा यासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असतानाही थंड राहिली आहे. सत्तेत सहभागी झाली तरी शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आमंत्रणावरून मानापमान नाटय़ घडविणाऱ्या शिवसेनेने महागाईवरून मात्र मौन पाळण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेला सत्तेची ऊब मिळाल्याने महागाईच्या झळांची तीव्रता जाणवली नसल्याने शिवसेनेने अजून आक्रमक भूमिका घेतलेली नाही.
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात १९९५ ते १९९९ दरम्यान पाच जीवनाश्यक वस्तूंचे दर रास्त धान्य दुकानांमध्ये स्थिर ठेवण्यात आले होते. मंत्रालयासमोर तसा फलकही लावला होता. पण आता ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारच्या काळात डाळी, कडधान्ये, कांदा आणि अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. शेतकऱ्यांना त्याचा लाभ फारसा मिळत नसून व्यापारी, साठेबाज, दलाल यांचे उखळ पांढरे होत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना देऊनही साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई तर दूरच, पण विविध वस्तूंच्या साठय़ाचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले नाही, दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, हस्तक्षेप करण्यासाठी निधी आदी तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. जनसामान्यांचे जिणे महाग करून व्यापारी, बिल्डर यांच्या लाभाचे निर्णय घेतले जात आहेत आणि दर नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने फारशी कोणतीच कृती केलेली नाही, अशी भावना सेनेचे नेते खासगीत व्यक्त करतात.
विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने दरवाढीवरून आंदोलने न करता केवळ टीकाटिप्पणी सुरू केली आहे, तर शिवसेनेने दरवाढीविरोधात आक्रमक भूमिका न घेतल्याने जनतेला मात्र महागाईला तोंड द्यावे लागत आहे.

विरोधी पक्षात असताना आधीच्या सरकारविरोधात भाजपपेक्षा शिवसेना आक्रमकपणे संघर्ष करीत होती. मोर्चे, निदर्शने आणि निषेध करण्याबरोबरच स्वस्त धान्य वाटप केंद्रांच्या माध्यमातून शिवसेनेकडून जनतेला मदतीचा हातही दिला जात होता. पण आता भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यावर शिवसेनेने शासकीय पातळीवर पावले उचलण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भाग पाडलेले नाही. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष व आंदोलने करू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली होती, पण अजून दरवाढीच्या मुद्दय़ावर आंदोलन करण्याचे आदेश ठाकरे यांच्याकडून पक्षाला देण्यात आलेले नाहीत. शिवसेनेने पक्ष पातळीवर जनतेच्या मदतीसाठी काही स्वस्त भाजीपाला केंद्रे मुंबईत अनेक ठिकाणी सुरू केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.