ठाण्याचे माजी उपमहापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर शिवसेनेच्या नजर कैदेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून त्यांच्या शोधासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असलेले पाटणकर समर्थक दयानंद नेने यांना बुधवारी रात्री शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने मोबाइलद्वारे संपर्क साधून याचिका दाखल करू नका, अशी विनंती केली आणि पाटणकर यांच्याशी बोलणे करून देतो, असेही सांगितले. त्यानुसार, पाटणकर यांचे नेने यांच्याशी बोलणेही झाले. त्यामुळे पाटणकर शिवसेनेच्या नजरकैदेत असल्याचे उघड झाले आहे.
मिलिंद पाटणकर यांच्या शोधासाठी वृंदावन परिसरातील रहिवासी बुधवारी सांयकाळी रस्त्यावर उतरले होते. तसेच पाटणकर पक्षाच्या संपर्कात असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे या रहिवाशांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस पाठवून विचारणा केली होती. त्यानंतर राबोडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही रहिवाशांनी भेट घेतली होती. पाटणकर यांच्या शोधासाठी त्यांच्या समर्थकांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. असे असतानाच मिलिंद पाटणकर वृत्त वाहिन्यांवर अवतरले आणि त्यांनी कर्नाटकात सुखरूप असल्याचे सांगितले. मात्र, तरीही त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने पाटणकर समर्थक दयानंद नेने यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून याचिका दाखल करू नका, अशी विनंती केली आणि पाटणकर यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यामुळे पाटणकर शिवसेनेच्या नजरकैदेत असल्याचे आता उघड झाले आहे.
ते दडपणाखालीच..
शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने मोबाइलद्वारे संपर्क साधून याचिका दाखल करू नका, अशी विनंती केली आणि पाटणकर यांच्याशी आमचे बोलणे करून दिले. सुमारे १५ मिनिटे त्यांनी तीन-चार नागरिकांशी संवाद साधला. निनावी क्रमांकावरून हा फोन करण्यात आला होता. कर्नाटकात सुखरूप असून तीन-चार दिवसांत परत येईन, असे पाटणकर यांनी सांगितल़े  पण, त्यांच्या या बोलण्यावर आमचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या बोलण्यातून ते दडपणाखाली असल्याचे जाणवत होते, अशी माहिती दयानंद नेने यांनी दिली. तसेच पाटणकर यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यामुळे याचिका तूर्तास दाखल करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.