मुंबई : महायुती व विशेषत: भाजपच्या गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे राज्यातील नियोजित प्रकल्प हलविण्यात आले व त्यातून राज्यातील सुमारे पाच लाख युवकांचे रोजगार बुडाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना केला. तसेच उद्धव ठाकरे बरोबर नसल्यानेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदारांचे संख्याबळ २३ वरून ९ पर्यंत घसरल्याचे सांगत टोला लगावला.

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचा ठाम विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. महायुती सरकारची कामगिरी, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व, मनसेची राजकीय वाटचाल अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला कौल मिळेल. महाराष्ट्र रिकामा करायला निघालेल्या भाजपला राज्यातील जनता रिकामे केल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या हे त्याचेच द्याोतक होते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील प्रस्तावित प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आले. टाटा-एअरबस प्रकल्प हा राज्यात येणार होता. पण गुजरातमध्ये हलविण्यात आला. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोद्यात रोड शो करून महाराष्ट्राच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळले. फॉक्सकॉन-वेदात्न प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तेव्हाही महायुतीचेच सरकार सत्तेत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकल्प राज्यात सुरू करण्यासाठी पाठपुरावा झाला होता. आमच्या सरकारच्या काळात दाव्होसमध्ये करार करण्यात आलेले ९५ टक्के प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाले आहेत. याउलट शिंदे सरकारच्या काळात करार झालेले प्रकल्प तर सुरू झाले नाहीतच पण त्याबरोबरच दाव्होस दौऱ्याचे पैसेही या सरकारने थकविले.

हेही वाचा >>> भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईतील प्रस्तावित आतंरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये हलविण्यात आले. बल्क ड्रग्ज प्रकल्पही राज्याबाहेर गेला. डायमंड बाजार गुजरातमध्ये हलविण्यात आला. मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांनी गुजरातमध्ये आपला व्यवसाय हलवावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली. मुंबई व महाराष्ट्राचे ‘अदानीराष्ट्र’ करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले आहेत. हा मराठी विरुद्ध गुजराती वाद नाही. तर महाराष्ट्राच्या हक्काचे काढून गुजरातला स्थलांतरित केले जात आहेत. महाराष्ट्रातील पाच लाख रोजगार हे गुजरातमध्ये गेले. प्रकल्प राज्यात सुरू झाले असते तर एवढा रोजगार महाराष्ट्रातील युवकांना मिळाला असता, असेही ठाकरे म्हणाले.

फुटिरांना पक्षात संधी नाही

बंडखोर आठ आमदारांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती. निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यापूर्वी आमच्यातून फुटून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आठ आमदार व दोन मंत्र्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती. यातील एका मंत्र्याच्या मतदारसंघात शिंदे यांनीच अगदी कालच सभा घेतली. सरकार पाडल्यावर हिडीसपणे नाच करणाऱ्या आमदारांना आम्ही बरोबर घेतले असते तर बंडखोरांचे पुनर्जीवन केल्यासारखे झाले असते. हे आम्हाला नको होते. ते योग्यही झाले नसते. यामुळेच या आमदारांना उमेदवारी देण्याचे टाळले, असेही ठाकरे यांनी सांगितले.