मुंबई : गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेला लोअर परेल रेल्वे उड्डाणपूलाच्या पूर्व दिशेच्या बाजूचा उर्वरित भागही दिवाळीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल पुलाच्या कामाची शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी वरील आश्वासन दिले.
धोकादायक बनलेला लोअर परळ (डिलाईल रोड) पूल जुलै २०१८ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. विविध अडथळ्यांमुळे या पुलाचे काम रखडले होते. लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. लोअर परेल पुलाची पश्चिम दिशेची बाजू जूनमध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हा संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत वारंवार हुकली होती. गणेशोत्सवाच्या काळात लोअर परेल, करीरोड, लालबाग या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाची दुसरी बाजूही सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली होती. त्यामुळे महानगरपालिकेने करीरोडच्या दिशेच्या पुलाच्या तीन मार्गिका सुरू करण्यात आल्या होत्या, तर उर्वरित तीन मार्गिकांचे काम अद्याप सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी या तीन मार्गिकांच्या कामाची शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी १० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पूल सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेविका स्नेहल आंबेकर, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
हेही वाचा >>> मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डिलाईल पुलाला प्रचंड विलंब झाला आहे. त्यामुळे या पुलाचे नाव ‘डिले’ पूल टेवण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी करीरोडकडची बाजू सुरू करण्यात आली. १० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पूल सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या पुलावर पदपथ तयार करण्याबाबतही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गोखले पूल पाडण्यासाठी घाई का केली
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. अंधेरीचा गोखले पूल पाडणे हा राजकीय स्टंट होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तो पूल पाडण्यासाठी एवढी घाई का केली ? असाही सवाल त्यांनी केला. गोखले पुलाबाबत रेल्वे सहकार्य करीत नसल्याचे समजते. लोअर परेल पुलाचे काम जसे रेल्वेने रखडवले तशीच गत गोखले पुलाबाबत होणार असल्याची भीतीही यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केली.