मुंबई : ‘‘मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलन सुरू असताना अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनीच मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या नाराजीचा एकाकी सामना करीत असतानाच अजितदादांना नेमका डेंग्यू झाला होता’’, अशी विधाने करीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारांना लक्ष्य केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दोन गटांत बेदिली असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये गेले काही दिवस कलगीतुरा सुरू होता. या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले. कदम यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर अजित पवार यांना लक्ष्य केले.

‘‘उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी धाव घेतली. दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तास्थापनेसाठी अजित पवारांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी प्रसिध्द आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलन सुरू असताना सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्याच आमदारांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला होता’’ याकडे कदम यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>> सातारा:आमदार मकरंद पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट; साताऱ्याच्या राजकिय वर्तूळात एकच खळबळ

 ‘‘अजित पवार यांच्या राजकीय चालींचा आपण अभ्यास करीत असल्याचेही कदम यांनी सांगितले. अजित पवार काहीही करू शकतात अशी शक्यताही कदम यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे आणि कदम यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार  परिषदेत कदम यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्याने कदम यांचा बोलविता धनी कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या आमदारांनी निधीवाटपावरून खदखद व्यक्त केली असतानाच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केल्याने शिंदे आणि पवार या भाजपच्या दोन मित्रांमध्ये सारे काही आलबेल नाही, हे स्पष्ट होते.

रामदास कदम यांनी स्वपक्षीय नेते गजानन कीर्तिकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल टिप्पणी करीत, त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. आता ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलत आहेत. कदम यांना अशी टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय जडली असावी.

-सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader ramdas kadam raise question on ajit pawar dengue timing during maratha reservation zws