Uddhav Thackeray on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीसाठी १८ नोव्हेबंर रोजी प्रचार संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी आज शेवटचा रविवार असल्यामुळं सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला आहे. राज्यात ठिकठिकाणी प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. मुंबईच्या बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली. मात्र ही टीका करत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नको ते विधान केलं. राज्यातील रोजगार, उद्योगधंदे गुजरातला पळविल्याबद्दल ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपावर टीका केली. तसेच मोदी-शाहांनी गुजराती माणूस आणि इतर भारतीय नागरिकांमध्ये दरी निर्माण केल्याचा आरोपही केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं. आम्हाला वाटलं, काय प्रेम आहे यांचं. आम्हाला भरून आलं. पण त्यामागील त्यांचा खरा हेतू आता समोर आला आहे. कारण राष्ट्रपुरुषांच्या यादीत एखाद्या व्यक्तीचं नाव टाकल्यानंतर त्यांचा फोटो आणि नाव कुणीही वापरू शकतं. त्यामुळेच लुटारू, मिंधे माझ्या वडिलांचं नाव वापरत आहेत. शरद पवारांच्याबाबतीत असं झालं नाही, कारण ते स्वतः दुसऱ्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळं त्यांनी त्यांचा फोटो वापरावर बंदी आणली. पण शिवसेनाप्रमुखांचं नाव तुम्ही कपट कारस्थान करून वापरलं. त्यासाठी दोन-तीन वर्षांआधीच नियोजन केलं होतं. फक्त शिवसेना फोडण्यासाठी हे कारस्थान केलं गेलं.
आक्षेपार्ह विधान काय?
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मी काल एकनाथ शिंदे यांना ठाण्यात जाऊन आव्हान दिलं. आज तुमच्या साक्षीने आव्हान देतो. तू जर मर्दाची औलाद असलास, पण वाटत तर नाही… तर तू तुझ्या वडिलांचा फोटो लावून मैदानात ये. मग तुला मतं तर मिळणार नाहीत, पण जोडे खावे लागतील.”