ठाणे लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रांत असलेल्या दहा लाख मतदारांच्या बळावर एका आमदाराला थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे मनसुबे ‘मातोश्री’वर आखले जात आहेत. मात्र, ‘दिल्लीपेक्षा आपली गल्लीच बरी’ वाटणाऱ्या आमदारांनी दिल्लीचे तिकीट दुसऱ्याच्याच गळ्यात मारण्याचे प्रयत्न सुरू केले असून स्थानिक पातळीवर तशी मोर्चेबांधणीही सुरू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. लोकसभा क्षेत्रातील येथील तीन विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचेच आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी व ओवळा-माजीवडा या मतदारसंघात सुमारे दहा लाखांहून अधिक मतदार असून ते शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षातील विद्यमान आमदारालाच खासदारकीचे तिकीट देण्याचा ‘मातोश्री’चा विचार आहे. मात्र, ठाण्याचे संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासह खादारकीसाठी चर्चेत असलेल्या प्रमुख आमदारांमध्ये यावरून चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळेच दक्षिण-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली तर ठाण्यातूनही चालेल, या मनोहर जोशींच्या भूमिकेमुळे येथील नेत्यांमध्ये उत्साह संचारला. ‘मातोश्री’चा कल पाहून जोशीसरांना ठाण्यातून निवडून आणण्याचा विडा उचलण्याची तयारीही या नेत्यांनी सुरू केली आहे.
ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना शह देण्यासाठी मागील निवडणुकीत शिवसेना नेत्यांनी विजय चौगुले यांच्या गळ्यात खासदारकीचे तिकीट मारले होते. ठाण्यातील नेत्यांच्या शब्दाला मान देऊन चौगुलेही मोठय़ा उत्साहाने निवडणुकीच्या बोहल्यावर चढले. मात्र, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच त्यांना पिछाडीवर रहावे लागले. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याचा मोठा फटका चौगुले यांना बसला. तरीही पक्षाच्या ठाण्यातील काही नेत्यांनी दगा दिल्याचा सल त्यांना आहे. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई किंवा मिरा-भाईंदरमध्ये लक्ष केंद्रित करण्याऐवजी बालेकिल्ल्यातच उमेदवार उभा करायचा यावर ‘मातोश्री’ने शिक्कामोर्तब केले आहे. नवी मुंबई व मिरा-भाईंदरच्या एकत्रित सव्वादहा लाख मतदारांच्या तुलनेत ठाण्यातील दहा लाख मते नाईकांना टक्कर देताना निर्णायक ठरतील, असा विश्वास ‘मातोश्री’ला आहे. त्यामुळे पक्षाच्या तिघा आमदारांपैकी एकाने नाईकांना आव्हान द्यावे, असा मतप्रवाह आहे. वेळ पडल्यास कल्याणमध्येही ठाण्यातून उमेदवार निर्यात करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ िशदे अथवा राजन विचारे या दोघांपैकी एकाने दिल्लीच्या मोहिमेवर निघावे, असे ठरते आहे. असे असले तरी एकेकाळी प्रतिष्ठेची मानली जाणारी खासदारकीची उमेदवारी नाही मिळाली तर बरे, या विचाराने पक्षातील आमदार व्यूहरचना करू लागले आहेत. यासंबंधी शिवसेना भवनात बोलावण्यात आलेल्या बैठकीत स्थानिक नेते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ‘मातोश्री’च्या आग्रहामुळे खासदारकी लढवावी लागली आणि पराभव झालाच तर पुन्हा विधानसभेचे तिकीट मिळावे, असा शब्द पदरात पाडून घेण्याची धडपडही या आमदारांमध्ये सुरू असल्याचे वृत्त आहे.

हा तर कल्पनाविलास
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. ते म्हणतील ती जबाबदारी खांद्यावर घेण्यास आम्ही तयार आहोत. खासदारकी टाळण्यासाठी ठाण्यातील आमदार प्रयत्नशील आहेत हा तर निव्वळ कल्पनाविलास आहे.
– आमदार राजन विचारे.

Story img Loader