नरेंद्र मोदी यांचे आमंत्रण स्वीकारून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ शपथविधीस येणार असल्याने, एवढेच नव्हे तर मुंबई हल्ल्यानंतर थांबलेली उभयपक्षी चर्चाही होण्याच्या शक्यतेने संतप्त झालेले शिवसेनेचे मंत्री २६ तारखेला शपथ घेणे टाळण्याची शक्यता आहे. मोदींना उघड विरोध करण्याची भूमिका घेण्यापेक्षा मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी अधिक वेळ घेण्याचा बहाणा शिवसेना त्यासाठी करणार असल्याचे समजते.
शिवसेनेने गेली अनेक वर्षे पाकिस्तान विरोधात उघड भूमिका घेतली आहे. क्रिकेट सामन्यांच्या वेळी खेळपट्टी उखडणे, पाकिस्तानी कलावंतांना विरोध करणे तसेच त्यांचे कार्यक्रम उधळणे, अशी आंदोलने आजवर केली आहेत. त्यामुळे आता शरीफ यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेणे, म्हणजे तोंड दाबून बुक्क्य़ाचा मार, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतली, तर सत्तेसाठी तत्त्वे सोडली अशी टीका होईल. शपथ न घेण्याची उघड भूमिका घेतली, तर मोदी नाराज होतील. सध्या सरकारला शिवसेनेच्या पाठिंब्याची कोणतीही गरज नाही. तरीही रालोआतील सर्वात जुना सहकारी पक्ष असल्याची जाण ठेवून मोदी यांनी त्यांना एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद देऊ केले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे पाठविण्याची सूचना मोदी यांनी ठाकरे यांना केली होती. तरीही देवदर्शनाचे कार्यक्रम सुरू असल्याने ठाकरे यांना मंत्र्यांची नावे ठरविता आलेली नाहीत. त्यामुळे आणखी वेळ देण्याची विनंती ठाकरे यांनी मोदींना केल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
आणखी वेळ देण्याची मागणी करून मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घ्यायची, अशी राजकीय व्यूहरचना सेनानेत्यांनी केली आहे. मोदी नाराज होऊ नयेत, यासाठी उद्धव ठाकरे सपत्नीक शपथविधी समारंभास उपस्थित राहतील. पण शिवसेनेच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे त्यांचेच नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेने सोमवारचा मुहूर्त टाळला, तर शिवसेनेला मंत्रिमंडळात स्थानही न देण्याचे प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यामुळे आता मोदी लाटेत तरल्यानंतर केंद्रात सत्ता हवी असेल, तर तत्त्वे बाजूला ठेवून मंत्रीपद पदरात पाडून घेणे, शिवसेनेच्या हातात उरले आहे. शिवसेनेची नावे रविवारी किंवा सोमवारी सकाळपर्यंत आली, तरच त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. त्यामुळे आता सेनेचे नेतृत्व तत्त्व आणि सत्ता यापैकी कशाला प्राधान्य देणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मग मियाँदाद कसा चालतो?
शरीफ यांना आमंत्रण दिल्याने आक्षेप असलेल्यांना पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आपल्या घरी आलेला कसा चालतो, असा कडवट सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेचे नाव न घेता उपस्थित केला आहे. देशाचे परराष्ट्र धोरण वेगळ्या पद्धतीने आखले जाते, ते देशांतर्गत राजकीय समीकरणांवर ठरत नसते, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
सोनिया-राहुलही येणार
निवडणूक प्रचारात मोदींचे प्रमुख लक्ष्य ठरलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे या शपथविधी समारंभास हजर राहाणार आहेत.
यांच्या नावांची चर्चा
केंद्रीय मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर रावसाहेब दानवे, हंसराज अहीर किंवा संजय धोत्रे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मुंबईतून पियुष गोयल, किरीट सोमय्या आणि पूनम महाजन यांच्या नावांची शिफारस राज्यातील नेत्यांनी केली आहे.
२७ मे रोजी भारत-पाक चर्चा?
मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील चर्चा थांबली आहे. शरीफ यांच्या दौऱ्यात ही खुंटलेली द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. २७ मे रोजी मोदी आणि शरीफ यांच्यात चर्चा होणार आहे असे समजते.
शरीफ यांच्यापुढे शपथ घेणे सेनेचे मंत्री टाळणार?
नरेंद्र मोदी यांचे आमंत्रण स्वीकारून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ शपथविधीस येणार असल्याने, एवढेच नव्हे तर मुंबई हल्ल्यानंतर थांबलेली उभयपक्षी चर्चाही होण्याच्या शक्यतेने संतप्त झालेले शिवसेनेचे मंत्री २६ तारखेला शपथ घेणे टाळण्याची शक्यता आहे.
First published on: 25-05-2014 at 04:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ministers avoid to swear in in front of nawaz sharif